सातारा : सातारा नगर पालिकेच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सातारा विकास आघाडीला मोठे खिंडार पडले. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक शिवाजी भोसले हे पत्नी नगरसेविका माधुरी भोसले यांच्यासह असंख्य समर्थकांबरोबर नगरविकास आघाडीत डेरेदाखल झाले. सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका आणि नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार माधुरी भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून वेदांतिकाराजे यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे.
दरम्यान, नगरविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय सहभागी होवून वेदांतिकाराजे यांच्यासह सर्व उमेदवार उच्चांकी मतांनी निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवाजी भोसले यांनी यावेळी सांगितले. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर सुमारे पाचच्या सुमारास माधुरी भोसले, शिवाजी भोसले, बाळासाहेब भोसले, संजय भोसले, सचिन भोसले, शाम भोसले, सुमित भोसले, अमित भोसले, अमोल भोसले, विकास भोसले, सुरज भोसले, राहूल भोसले, शुभम भोसले, शगुन भोसले, सारिका भोसले, मंजुषा भोसले, वैशाली भोसले यांच्यासह भोसले मळा, भोसले नगर व करंजे परिसरातील शिवाजी भोसले समर्थक व महिला सुरुची निवासस्थानी डेरेदाखल झाल्या.
यानंतर माधुरी भोसले, शिवाजी भोसले व समर्थकांचे वेदांतिकाराजे भोसले आणि आघाडीचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वागत केले. यानंतर शिवाजी भोसले आणि माधुरी भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे व सौ. वेदांतिकाराजे यांच्यासमोर आपली भुमिका स्पष्ट केली. सौ. वेदांतिकाराजे यांच्यामुळे पालिका प्रशासनाला शिस्त लागेल. सातारकरांना पारदर्शक आणि जनहिताचे प्रशासन लाभावे यासाठी सौ. वेदांतिकाराजे यांच्याशिवाय पर्याय नसल्याने आणि सातारा विकास आघाडीकडून न्याय न मिळाल्याने आपण उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचे माधुरी भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
यापुढे नगरविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा शहराच्या विकासासाठी योगदान देणार असल्याचे सौ. भोसले म्हणाल्या. बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली नगरविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट होणार आहे.
पदयात्रा, कोपरा सभा यासह प्रचाराशी निगडीत सर्वच कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणार असल्याचे सांगून शिवाजी भोसले यांनी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.