दळणवळण सुविधेला प्राधान्य
सातारा : जिथे रस्ता, तिथे विकास या सुत्राचा अवलंब करुन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदारसंघात डांबरी रस्त्यांचे जाळे विणले आहे. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून दळणवळणाच्या सुविधेला नेहमीच प्राधान्य देण्यात आले असून जावली तालुक्यातील आणखी चार गावातील रस्ते जोडण्यासाठी ओढ्यावर लहान पुल बांधण्यासाठी पाठपुरावा करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या चार पुलांच्या कामांसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2016- 17 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत डोंगराळ भागामध्ये साकव बांधण्यासाठी विशेष कार्यक्रम या योजनेतून 85.3 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. यामुळे खर्शी- बारामुरे – रामवाडी, निपाणी, मार्ली आणि कुसुंबी- बामणवाडी- मेसाचीवाडी या गावांचा अंतर्गत दळणवळणाचा प्रश्न कायम स्वरुपी मिटणार आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जावली तालुक्यातील खर्शी- बारामुरे – रामवाडी, निपाणी, मार्ली आणि कुसुंबी- बामणवाडी- मेसाचीवाडी या गावातलगत असलेल्या ओढ्यावरुन पुलाअभावी अंतर्गत दळणवळणाची अडचण निर्माण होत होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चार गावातील ओढ्यावर लहान पुल बांधण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर चार ठिकाणी पुल बांधण्यास मंजूरी मिळाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत डोंगराळ भागामध्ये साकव बांधण्यासाठी विशेष कार्यक्रम या योजनेतून जावली तालुक्यातील खर्शी- बारामुरे- रामवाडी येथील नौकाचा ओढा याठिकाणी साकव बांधण्यासाठी 22.62 लाख, निपाणी येथील ओढ्यावर साकव बांधण्यासाठी 20.62 लाख, मार्ली स्मशानभुमीकडे जाणार्या रस्त्यावरील ओढ्यावर साकव बांधण्यासाठी 20.02 लाख तर, कुसुंबी- बामणवाडी- मेसाचीवाडी रस्त्यावर साकव बांधण्यासाठी 22.04 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांची लवकरच निवीदा प्रक्रिया मार्गी लागणार आहे. निवीदा प्रक्रीया पुर्ण करुन पुलांची कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जावलीचे सहायक अभियंता मधूकर सूळ यांना केल्या आहेत.