पिस्तूलचा धाक दाखवणार्या दोघांवर गुन्हा
सातारा : उंब्रज, ता. कराड गावच्या हद्दीत उंब्रज एस. टी. स्टॅन्ड ते पेरले गावच्या दरम्यान ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर बेळगाव ते मुंबई एस. टी. प्रवासात असणार्या प्रवाशाला अज्ञात दोघांनी शिवकृपा कुरिअरची रोख रक्कम व दागिने असा 22 लाखाचा ऐवज लांबवल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञातांपैकी एका कडून पिस्तुलाचा गोळीबार झाल्याने घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. या लुटीमागे मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त होत असून उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानेश्वर किसन पुंडेकर (वय 27, रा. मुळीकवाडी, ता. फलटण, हल्ली रा. भेंड गल्ली कोल्हापूर) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पुंडेकर शिवकृपा कुरिअरची रोख रक्कम व दागिने असलेली बॅग घेवून बेळगाव-मुंबई बसने कोल्हापूरवरुन प्रवास करत होते. रविवारी रात्री पावणे अकरा वाजता बस उंब्रज एस. टी. स्टॅन्डच्या पुढे आली असता अज्ञात दोघांनी महामार्गावर पिस्तुलाने फायर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. व पेरले गावच्या दरम्यान, बसमधील पुंडेकर यांची रोख रक्कम व दागिने असलेली बॅग हिसकावली. तसेच त्यांच्या पाकिटातील पैसे गायब करण्यात आले. अज्ञात दोघांसह इतर दोघे बसमधून उतरुन दोन यामाहा मोटार सायकलीवरुन गायब झाले. एस टी चालकाने घटनेचे गांभीर्य ओळखून उंब्रज पोलिसांना खबर दिली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक के. जी. घाडगे यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. फिर्यादीच्या वर्णनानुसार बॅग चोरलेला इसम मध्यम उंचीचा गोल चेहर्याचा 30 ते 32 वयोगटातील होता. त्याने हिरव्या-पिवळ्या रंगाचा लाईनिंगचा शर्ट व त्यावर जर्कीन घातले होते. तर फायरिंग केलेला 25 ते 30 वयोगटातील इसम काळ्या रंगाचे जर्कीन व गॉगल घातलेला होता. या वर्णनानुसार उंब्रज पोलिसांनी दोन पथके तयार करुन तातडीने तपासासाठी रवाना केली आहेत. अधिक तपास सुरु आहे.