साताराः स्वच्छ कारभाराचा ढिंडोरा पिटणार्या भाजपाच्या शासनाने भ्रष्ट, लाचखोर नगराध्यक्षांना पाठीशी घालून आपल्या तत्वांना तिलांजली देवून वाईकर नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. जोपर्यंत भ्रष्ट नगराध्यक्षा आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आपले आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अनिल सावंत व तीर्थक्षेत्रच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान वाईच्या गौरवशाली परंपरेला काळीमा फासणार्या नगराध्यक्षांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी तीर्थक्षेत्र आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक अॅड. श्रीकांत चव्हाण, प्रदिप चोरगे, चरण गायकवाड, राजेश गुरव, दिपक ओसवाल, भारत खामकर, संग्राम पवार, शिंदे, प्रियांका डोंगरे, रेश्मा जायगुडे, आरती कांबळे, प्रदिप जायगुडे, संदिप डोंगरे, अजित शिंदे, गौरव कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, वाईकरांनी सुशिक्षीत उमेदवार म्हणून वाई शहराच्या व्यापक विकासाचा दृष्टीकोन ठेवून डॉ. प्रतिभा शिंदे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. आम्हीही तीर्थक्षेत्र आघाडीचे बहुमत असताना केवळ शहराच्या विकासासाठी त्यांना सहकार्याची भूमिका ठेवली.
परंतू त्यांनी सदैव अहंपणा बाळगून निवडून आलेल्या नगरसेवकांचे प्रश्न सोडवण्यात दुजाभाव दाखवला. राज्यात व देशात भाजपचे शासन असून कोणत्याही प्रकारचा विकासाचा मोठा प्रस्ताव शासनाकडे मांडला नाही. उलट त्यांनी नगराध्यक्षांचा पदभार स्विकारल्यापासून जुनी प्रलंबित बीले काढण्यातच जास्त रस दाखवला.त्याचे गुपित या कारवाईने उघड झाले आहे.
नगरपालिकेच्या कारभारात नगराध्यक्षांच्या पतीची ढवळाढवळ सुरवातीपासूनच होती. त्यांनी ज्ञानदानाचे काम थांबवून सरस्वतीची पूजा थांबवून लक्ष्मीपूजनाला वाहून घेतले होते. नगराध्यक्षा त्यांच्या बगलबच्च्यांच्या विचाराने काम करत असून त्या विरोधी नगसेवकांच्या प्रश्नांना नेहमी डावलण्याचे पाप करत आहेत.
वाईकर नागरिकांनी त्यांना जात न पाहता निवडून दिले असून स्वत:चे गैरकृत्य लपविण्यासाठी जातीचा मुद्दा पुढे रेटून जातीचा रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. त्यांच्या या कृतीने सांस्कृतिक वाई नगरीच्या परंपरेला वैयक्तिक स्वार्थापोटी तिलांजली वाहण्याचे कृत्य नगराध्यक्षांच्या हातून घडले आहे. तरी नैतिकतेची चाड ठेवून नगराध्यक्षांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी केली.
माजी नगराध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण म्हणाले, मी सुध्दा जनतेतूनच निवडून आलो होतो. त्यावेळीही पालिकेत अशीच राजकीय परिस्थिती होती, परंतू वाई शहराच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेवून कारभार केला. आता नगराध्यक्षांच्या आडमुठया भूमिकेमुळे वाई शहराचे मोठे नुकसान होणार असून वाईकरांना एका मताची किंमत मोजावी लागली आहे.
कायद्याच्या कलम 42 नुसार लोकनियुक्त नगराध्यक्षांनी पालिकेचा अवमान करणारे लज्जास्पद कृत्य केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची मागणी नागरिक करू शकतात, असेही ते म्हणाले.
वाई नगराध्यक्षांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
RELATED ARTICLES