Sunday, January 25, 2026
Homeठळक घडामोडीम्हणूनच जनतेने खासदार म्हणून वाढीव मतांनी पुन्हा संधी दिली : श्री.छ.उदयनराजे

म्हणूनच जनतेने खासदार म्हणून वाढीव मतांनी पुन्हा संधी दिली : श्री.छ.उदयनराजे

कुंभारगाव : जनतेच्या विश्वासाला पात्र राहीलो, म्हणूनच जनतेने खासदार म्हणून वाढीव मतांनी पुन्हा संधी दिली. जर मी कामेच केली नसती तर दुस-यांदा निवडूनच आलो नसतो, मी काहीच कामे केली नाहीत, असे तुणतुणे वाजवणार्‍या विरोधकांनी अगोदर मी केलेल्या 18 हजार 125 कोटी 74 लाखाच्या कामाची माहिती घ्यावी, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
कुंभारगाव, ता. पाटण येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, संजय देसाई, राहुल चव्हाण, प्रतापराव देशमुख, वंदनाताई आचरे, भालेराव सावंत, जे. पी. पाटील, संगीत गुरव, पोपटराव पाटील, सुनिल काटकर, डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
संसद सदस्यास मतदारसंघात विकासकामांसाठी दरवर्षी पाच कोटी रुपये निधी असतो. त्या हिशोबाने विचार करता या पाच वर्षात किमान 25 कोटी रुपये मी मतदारसंघात विकास कामांसाठी खर्च केले आहेत, आणि असे असतानाही खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पध्दतीने माझ्यावर खोटे आरोप करणा-या विरोधकांच्या वल्गनांनवर जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. असे सांगून खा. श्री. छ. उदयनराजे पुढे म्हणाले की, लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार कोणीही निवडणूकीस उभे राहू शकते. मात्र लोकशाहीत काही संकेतही पाळायचे असतात. विरोधक नव्यानेच रणांगणात उतरल्याने त्यांना व्यक्तीगत टिका करण्याशिवाय काहीच सुचत नाही. जनतेमुळेच मी या पदावर आहे. त्यामुळे मला मिळणारा खासदार निधी विकासांवर खर्च करत असतोच. मात्र त्याबाबत खोटी माहिती जनतेत पसरविण्याचा उदयोग विरोधकांनी करु नये.
गेली 10 वर्ष मी खासदार आहे व 29 वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. या कालावधीत मी कधीही कोणावर अन्याय केला नाही व होवू दिलाही नाही. असे असताना विरोधक माझी दहशत आहे. असे म्हणू कसे शकतात ?असा प्रश्न उपस्थित करुन, खासदार उदयनराजे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात कराड – चिपळूण रेल्वे मार्गासाठी 4500 हजार कोटीची कामे चालू आहेत, शेंद्रे – कागल सहापदरीकरणासाठी 1800 कोटी मंजूर आहेत, खंबाटकी घाटातील नवा बोगदा मीच मार्गी लावला, त्यासाठी 753 कोटीचा निधी आणला. पुणे – मिरज रेल्वे डब्लिंगसाठी 3500 कोटी रुपये आणले. राष्ट्रीय व राज्य रस्ते विकासासाठी 4500 कोटी मंजूर केले . सुरूर – वाई – महाबळेश्वर रस्यासाठी प्रयत्न केले, कास धरणाची उंची वाढविण्यासाठी 100 कोटी आणले, शिवाय लघू पाटबंधारे, जिल्हा मार्ग मजबूतीकरण, जिल्हा वार्षीक योजना आदिंच्या माध्यमातून ही विकासाची गंगा जनतेपर्यंत नेली आहे. 18 हजार 125 कोटीं 74 लाखाची विकास कामे मंजूर करुन मतदारसंघात विकासाचा झंजावात निर्माण केला आहे. तो विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी पाहावा, मगच माझेवर टीका करावी.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटील म्हणाले की, मी 500 कोटी आणले, हजार कोटी आणले. अशा घोषणा पाटण तालुक्यात काही जण करतात. मात्र त्यांच्या माधयमातून कितीतरी निकृष्ट कामे झाल्याचे दिसून येते. पावसाळ्यात तर रस्त्यावरील खड्डे मोजण्याची वेळ येईल, इतकी दर्जाहीन कामे टक्केवारीच्या साखळीतून विरोधकांनी केली आहेत. त्या सर्वांना धडा शिकवण्यासाठी मतदानाचा पवित्र अधिकार वापरा.
हिंदुराव पाटील म्हणाले कीं, देशाच्या सीमा केवळ काँग्रेसनेच 70 वर्षे सुरक्षित ठेवल्या. पाकिस्थांनसोबतचे युद्ध, बांगलादेशची फाळणी अशा आपत्कालातही शत्रू राष्ट्रे भारताच्या सीमांना धडकू शकली नव्हती. मात्र सध्याच्या सरकारच्या ताब्यात देश सुरक्षित नाही. त्यामुळे देशात परिवर्तन घडवण्यासाठी उदयनराजेंनाच मते द्या.
राहुल चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांचीही यावेळी भाषणे झाली. या सभेस कुंभारगाव, ढेबेवाडी पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular