खंडाळा ः स्त्री शिक्षण, स्त्री पुरूष समानता व जातीच्या निर्मुलनासाठी आयुष्य वेचणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळ गावी नायगाव येथील स्माकाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले. सातारा जिल्ह्यामध्ये या सावित्रीच्या लेकी परिवर्तन घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख आदेश खताळ, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, खंडाळा तालुका शिवसेना प्रमुख अंकुश पवार, उपतालुका प्रमुख मंगेश खंडागळे, भाजपा तालुका प्रमुख राहुल हाडके, नायगावचे सरपंच सुधीर नेवसे यांच्यासह खंडाळा तालुक्यातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. प्राची पाटील म्हणाल्या, महात्मा ज्योतीबा फुले दुःखाचे कारण अविद्या आहे असे म्हणत. म्हणून त्यांनी शेतकर्यांचा आसुड या ग्रंथात म्हटलेे आहे की, विद्ये विना मती गेली…मती विना निती गेली. निती विना गती गेली…गती विना वित्त गेले… वित्त विना शुद्र खचले…एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतीकारक तर आहेच पण एक नविन तत्वज्ञान मांडणारा आहे.
नायगाव येथे सरकारने चांगल्या पध्दतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दुर्मिळ वास्तूचे जतन केले आहे.
याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक दुर्मिळ वास्तू, शहिद जवानांचे स्मारक होऊन जतन होणे गरजेचे आहे. तसेच या तालुक्यातील स्नेहल धायगुडे या युवतीने युपीएससी परिक्षेत मिळविलेले यश हे खरच कौतुकास्पद आहे. खर्या अर्थाने या तालुक्यातील सावित्रीच्या लेकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालवत आहेत. यामुळे ह्या लेकी या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावित्रीच्या लेकी जिल्ह्यातील परिवर्तन करतीलः डॉ. प्राची पाटील
RELATED ARTICLES

