सातारा : विद्यमान खासदारांना मी 23 प्रश्न विचारले होते, पण त्यांनी एकही प्रश्नांची उत्तर दिले नाही. सातार्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे दिली आहेत. असे असताना खासदार म्हणतात, मी आणली यावर मुख्यमंत्री याचा पोलखोल करणार आहेत. दरम्यान गेल्या निवडणूकित उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे 9 मातब्बर मला आतून मदत करत आहेत. तसेच काँगेसचे माजी मंत्री विलास काका पाटील उंडाळकर यांचा मी आशीर्वाद घेऊन निवडणूक रिंगणात उतरलो आहे. असा गौप्यस्फोट युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा पालिकेत सावळा गोंधळ सुरू आहे. पालिका काही नगरसेवकांचा अड्डा बनला आहे. खासदारांनी ज्या हॉटेल मध्ये प्रचाराचे निवडणूक कार्यालय सुरू केले. त्या रजततंद्री हॉटेलचा 53 लाख रुपयांचा कर थकला आहे. त्यांनी पालिकेला कर भरलेला नाही. अशा ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करणे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही. अधिकार्यांनी परवानगी दिली कशी याची चौकशी झाली पाहिजे.
विद्यमान खासदारांना 23 प्रश्न विचारले होते पण त्यांना एकही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. सातार्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न झालेच नाहीत. दुष्काळग्रस्थांच्या पाणी प्रश्न सोडवता आला नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. दुष्काळ वर प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर नाही. सातारा शहराचा विकास का खुंटला? यावर खासदारांनी मौन धारण केल्याचा आरोप पाटील यांनी केला. सातार्यात जी कामे सुरू आहेत, ती कोट्यवधी रुपयांची विकास कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. असे असतानाही खासदार म्हणतात मी आणली. यावर मी अधिक सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री यावर बोलणार आहेत. मी आमदार असताना मी निधी दिला आहे. त्यामुळे माझे सर्व आमदारांशी चांगले संबंध आहेत. कॉग्रेसचे माजी आमदार विलासकाका पाटील उंडाळकर हे तुमच्याबरोबर आहेत का? यावर पाटील म्हणाले, विलासकाका माझ्या वडिलांसारखे आहेत. काकांचा आशीर्वाद घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मला विजयी करण्यासाठी गत निवडणुकीत जे नऊ जण उदयनराजे यांच्या विरोधात लढले होते. ते सर्वजण मला मदत करणार आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यामध्ये राजेंद्र चोरगे, पांडुरंग शिंदे, वर्षा माडगूळकर आदीचा समावेश आहे. जे आणखी काही मातब्बर लोक मदत करत आहेत, त्यांची नावे मी उघड करून त्यांना अडचणीत आणायचे नाही. यावेळी मतदार दबाव झुगारून परिवर्तन घडवून आणणार आहेत, हे 23 तारखेच्या मततातून दिसून येईल.
भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले, युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा प्रचार करत नाहीत अशा भाजपचे काही लोकप्रतिनिधी व एक झेडपी सदस्य अशा चार जणांवर प्रचारत सहभागी नाहीत म्हणून कारवाई करावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
पत्रकार परिषदेला नगरसेवक धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, विजय काटवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.