सातारा : लोकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवार असलेल्या नरेंद्र पाटील यांना प्रचारात त्यांनी सातारा जिल्ह्यासह मतदारसंघात स्वत: केलेली विकासकामे व सामाजिक कामाबाबत सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते खा. श्री. छ. उदयनराजेंचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आजच्या साता-यातील पत्रकार परिषदेत 23 चा पाढा वाचला आहे. मात्र त्यांचे अंकगणित कच्चे असल्याने अजुनही त्यांना स्वत:ला 23 चा पाढाच नीट म्हणता येत नाही. याऊलट माझे त्यांना खुले आव्हान आहे की, कोणतेही प्रश्न उपस्थित करण्याऐवजी त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, मगच त्यांनी खा. श्री. छ. उदयनराजेंना आव्हान द्यावे असा पलटवार जि. प. माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर यांनी मारला आहे.
युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या टिकेला उत्तरे देताना श्री. काटकर यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे नरेंद्र पाटील यांनी द्यावीत असेही म्हटले आहे.
नरेंद्र पाटील, तुम्ही सातारकरांकरीता आजपर्यंत काय केले?, तीन तीन पक्ष का बदलले?, माथाडी कामगारांकडून लायसन्ससाठी 2 लाख रुपये का घेता?, माथाडी कामगाराच्या कमाईतले 2 रूपये कोण घेतं?, सातारा एमआयडीसीसाठी तुम्ही काय केल?, सातारकरांच्या पाणी प्रश्नांसाठी काय केले?, सहा वर्षे आमदार आहात असे सांगता, तेव्हा तुमच्या आमदारकीच्या कार्यकाळात साता-याचे किती प्रश्न मांडले किंवा सोडवले ?, शहीद जवानांच्या परिवारासाठी तुम्ही काय केलं?, निदान त्याच्या दु:खात तरी सामील झाला का?, टॅक्सीचालकांच्या संपावेळी तुम्ही कुठे होतात ?, लोडशेडिंगच्या विरोधात आवाज ऊठवला तेव्हा तुम्हाला सातारा का नाही आठवला ?, पूरग्रस्त जनतेला काय मदत केली?, झोपडपट्टीधारकांसाठी तुम्ही कोणत्या योजना आणल्यात?, झोपडपट्टीधारकांना स्वत:ची घर मिळुन दिली का?, स्वच्छ सातारा होण्याकरिता तुम्ही काय केलं?, सातार्यातील पाणी बाहेर जात होते तेव्हा कुठे होतात आपण? कराड तालुक्यातील आरटीओ ऑफ़िस मागणीच्या वेळेस तुम्ही कुठे होता? सातार्यातील शेतकरी, कामगार, मजुरांना त्यांचा हक्काचा मोबदला का नाही मिळवून दिला? या माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, मगच त्यांनी खा. श्री. छ. उदयनराजेंना आव्हान द्यावे. पाटील… लक्षात घ्या की, सातारकर कुल आहेत – फूल नाहीत, असेही काटकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पाटील… अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या :सुनील काटकर यांचा नरेंद्र पाटलांवर पलटवार
RELATED ARTICLES