सातारा: विविध प्रश्नांवर जीव धोक्यात घालून आंदोलन व समाजकार्य करणार्या राजकीय कार्यकर्त्यांवरील हल्ले निषेधार्ह व चिंताजनक आहेत, असे मत व्यक्त करत भाजप शहराध्यक्ष सुनिल काळेकर व सहकार्यांवर अवैध व्यावसायिकांनी केलेल्या हल्ल्याचा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे.
याबाबत राहुल पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फॅक्सद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक कार्य व राजकारण करत असताना विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या परीने समाजसेवा करीत असतात. समाजातील अवैध व्यावसायिक व कृष्णकृत्य करणार्या समाजविघातक प्रवृत्तींवर आसूड ओढणे हे सामाजिक कार्यकर्त्याचे कर्तव्यच असते. मात्र, हे सहन न होऊन राजकीय नेतेमंडळींवर होणार्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
भाजपचे सातारा शहराध्यक्ष सुनील काळेकर व उपाध्यक्ष संदीप मेळाट यांच्यावर अवैध मटका व्यावसायिक जब्बार पठाण व त्याच्या साथीदारांनी काल खूनी हल्ला केला. या हल्ल्यात काळेकर व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सातारा शहरातील मुख्य बसस्थानकासमोर मेढा येथील जब्बार पठाण या मटका व्यावसायिकाचा अड्डा आहे. या अड्ड्यासाठी त्याने जवळच्याच सुलभ शौचालयातून चोरुन वीज घेतली आहे.
मटका व इतर अवैध व्यवसायांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते व युवा पिढी चुकीच्या दिशेने जात आहेत. त्यास अटकाव घालावा म्हणून विविध पक्षसंघटना वेळोवेळी पोलिसांकडे धाव घेत असतात. मनसेनेही याबाबत जोरदार आवाज उठवला आहे.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी याप्रश्नी बेमुदत उपोषणही केले होते. भाजप शहराध्यक्ष श्री. काळेकर यांनी पठाणच्या बसस्थानकासमोरील मटका अड्ड्याचे मोबाईलवर शुटींग केल्याचे लक्षात आल्यावर जब्बार पठाण व त्याच्या साथीदारांनी दगड, दांडकी व धारदार शस्त्रांनी श्री. काळेकर व श्री.मेळाट यांच्यावर हल्ला केला.
हा प्रकार निषेधार्ह असून राजकीय कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी समाजविघातक प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवायचा की नाही? हा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने ठोस कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने याप्रश्नी आवाज उठवेल, असा इशाराही राहुल पवार यांनी या निवेदनात दिला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात श्री. पवार यांच्यासह मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास रणदिवे, दिलीप सोडमिसे, अझहर शेख आदींच्या सह्या आहेत.