सातारा : ज्योतिर्मय महोत्सवास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. या महोत्सवात गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात असल्याने महिलांनी या महोत्सवास आवर्जुन भेट देवून वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटावा असे उद्घार राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी केले.
सातारा-कोरेगाव रोडवरील सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित केलेल्या ज्योतिर्मय महोत्सव 2017 चे राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस अतुलबाबा भोसले, रविंद्र भोसले, अॅड. नितीन शिंगटे, प्रशांत खामकर, प्राची राहणे, नगरसेवक विजय काटवटे, अभय पवार, बबनराव कांबळे, महेंद्र कदम यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांनी स्वागत केले.
पुढे बोलताना राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, ज्योतिर्मय महोत्सवास महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीसाठी स्टॉलवर लावून त्या ग्राहकांना ना नफा ना तोटा या तत्वावर नाममात्र दरात दिल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून या महोत्सवात स्टॉल सहभागी होत असतात. येथे येणार्या बाल गोपाळांच्या मनोरंजनासाठी खेळण्याचे पाळणे तसेच खाद्यपदार्थ स्टॉल लावले आहेत. ते निश्चित महिलांच्या पसंतीस उतरतील. ज्योतिर्मय फौंडेशनला लागेल ती मदत पुरविण्यास आपण तयार आहोत असा विश्वास राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या सर्व संचालिका, महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया: प्रमोद इंगळे)