सातारा : माणदेशी फौंडेशन व माण देशी महिला बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या माणदेशी महोत्सव 2017 हा कौतुकास्पद आहे. फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी सातारा जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात उद्योग क्षेत्रात उंचावले आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेती अमृता सुभाष यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित केलेल्या माणदेशी महोत्सव 2017 चे उद्घाटन दीपप्रज्वलन व स्टॉलची पहाणी करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अभिनेत्री अमृता सुभाष बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माणदेशी फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा माजी नगरसेविका सौ. सुवर्णाताई पाटील, माणदेशी महिला सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखा कुलकर्णी, गटशिक्षणअधिकारी खंदारे साहेब तसेच फौंडेशनच्या संचालिका उपस्थित होत्या.
पुढे बोलताना अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाल्या, माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणाचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालास चांगली बाजारपेठ मिळावी, दुष्काळी भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून श्रीमती चेतना सिन्हा यांनी जो उपक्रम राबविला आहे त्याला मनापासून शुभेच्छा
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या, माणदेशी फौडेशनने महिला उद्योजिका हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थीनीनी व महिलांना संगणकाचे प्रशिक्षण स्वत:च्या गावात व परिसरात मिळावे या हेतूने गेल्या 7 वर्षांपासून फिरता व्यवसाय व संगणक प्रशिक्षण शाळा कार्यरत ठेवली आहे. या उपक्रमांतर्गत संगणक प्रशिक्षणाच्या मोबाईल बस व्यवसाय शाळा कार्यरत आहेत. या बसमध्ये संगणक, शिलाई मशिन व ब्युटी पार्लरची सुविधा उपलब्ध केली आहे. कोण होईल करोडपती या अभिनेता अमिताभ बच्च यांच्या कार्यक्रमात आपण स्वत: सहभागी होवून लाखो रूपये बक्षिस मिळविले.
या बक्षिसाची रक्कम मी माझ्या माण तालुक्यातील जलयुक्त शिवार अंतर्गत सिमेंट बंधार्यासाठी वापरून दुष्काळी लोकांचे जीवन समृध्द करू असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, माणदेशी महोत्सव आता लोकचळवळ बनून राहिला आहे. याला निश्चित स्वरूपात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. दि.23 ते 27 नोव्हेंबर या काळात माणदेशी महोत्सवास जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी आवश्य भेट द्यावी. यावेळी माजी नगरसेविका सुवर्णाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या सख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. माणदेशी महिला बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.