पंकजांची नाराजी नको
राम शिंदेंनी पदभारच स्वीकारला नाही
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरचे नाराजीनाट्य आणि संघर्ष अद्याप कायम असल्याचे दिसते. कारण राम शिंदे यांनी अद्याप जलसंधारण विभागाचा पदभारच स्वीकारलेला नाही. पंकजा मुंडे यांची नाराजी टाळण्यासाठी, राम शिंदे यांनी पदभार स्वीकारलेला नाही, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
राम शिंदे हे पंकजा मुंडे परदेशातून आल्यानंतरच त्यांच्याशी सल्लामसलत करून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील शितयुद्धात आपला बळी न जावा यासाठी राम शिंदे यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास राम शिंदे यांनी नकार दिला आहे. सध्या राम शिंदे मतदारसंघात असून दोन दिवसांनी मुंबईत परतणार असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात राम शिंदे यांची गृहराज्य मंत्रीपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंकडून काढून घेण्यात आलेले जलसंधारण खातं देण्यात आले.