मायणी :- आज सातारा जिल्ह्यात यशवंत विचाराचा आणि ,लोकशाहीची खरी व्याख्या याचा विसर जिल्ह्यातील प्रत्येक कथित नेता ,विविध पक्ष संघटना याना पडलेला दिसून येत आहे . ‘लोकशाही’ हा शब्द फक्त सर्वसामान्य लोकांना संबोधताना जाहीर पणे सोज्वलपणे ,प्रमाणिकपणाचा बुरखा ओढून स्व घोषित नेते सर्वत्र उच्चारताना दिसून येतात. परंतु ही लोकशाही म्हणजे काय याचा कोणी विचारच करीत नाही .राजकीय स्वार्थापोटी आंधळे झालेल्या पुढाऱ्यांना आपण पुढील पिढी पुढे काय आदर्श ठेवतोय ,त्यांचे भविष्य कशा प्रकारे उध्वस्त करतोय याच भानही राहत नाही .
माणसाला अन्न, वस्त्र ,निवारा,शिक्षण,आणि आरोग्य या मूलभूत गरजा मिळाल्या तर तो आयुष्यभर सुखी राहत असतो. परंतु अधिक पैशाच्या हव्यासात आपल्या समाजशीच आपण करीत असलेली गद्दारी ,याला स्वतःचा खोटा स्वाभिमान ,आणि प्रतिष्ठा असे आजकाल संबोधले जाते आहे.
सातारा जिल्ह्याची सामाजिक,क्रीडा,राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रातील नावलौकिक देशातच नाहीतर जगाच्या पाठीवर गाजला आहे आणि गाजत आहे.परंतु मतांच्या बेरीज वजाबाकीत जातीपातीचे व खालच्या पातळीवरील होणारी टीकाटिप्पणी व त्याच थराचे राजकारण आज जिल्ह्याच्या विकासाला कुठेतरी खो तर घालत नाही ना ? हा प्रश्न पडतो.
सर्वत्र विकासाच्या नावाने सामान्य लोकांना जे मृगजळ दाखवण्यात येत आहे परंतु आपल्या तुंबड्या भरून ,पोस्टर बाजीतच आपले कर्तृत्व आणि धन्यता लोकप्रतिनिधींना नियती कदापि माफ करणार नाही .
केंद्रात व राज्यात किंबहुना जिल्ह्याच्या पालकमंत्री, यांचे पर्यंत भाजप शिवसेना व मित्रपक्षाची सत्ता आहे,आणि विविध नगरपालिका,नगरपंचायत ,ग्रामपंचायतीत त्यांच्या सत्तेचे बीज रोवले गेले आहे. आणि विरोधी कॉग्रेस,राष्ट्रवादी यांचे म्हणणे नुसार ‘फक्त देशात राज्यात दिखाव्याचा विकास सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे ” परंतु सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतो की,आघाडी सरकारच्या काळातच सुरू झालेल्या विविध पाणी योजना,आणि इतर योजना आज निधीच्या अभावी २ वर्ष मुदतीत पूर्ण होणारे काम १० वर्षे किंबहुना त्याहूनही जास्त काळ होऊन अद्यापही पूर्ण झालें नाही. या कामांना आज वर सत्तेत असलेले आघाडी सरकार का पूर्णत्वास पूर्ण करू शकले नाही? आणि आजच्या भाजपा शिवसेना व मित्रपक्षाची सरकारने या कामांना पूर्णत्वास नेले तर २०१९ च्या निवडणुकीत मतदार आपल्याला निवडणार का? ही भीती तर विरोधीपक्षांना पडली ना ? हा सवाल सर्वसामान्य करीत आहे .
सातारा जिल्ह्याच्या खटाव माण या तालुक्यांचा भाग वगळता उर्वरित भागाला निसर्गाने भरभरून दिले आहे.तेथे दुष्काळाची छाया कमीच असते.परंतु खटाव माण या भागांत दुष्काळाचे चटके आजही बसत आहेत.देश स्वतंत्र होऊन ६० वर्षे उलटून गेली तरीही या भागातील शेतकरी आजही पाण्यासाठी पारतंत्र्याच्या यातना भोगत आहे .स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात जास्त सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष असो,१९९९ साली स्थापण झालेला आणि २०१४पर्यंत केंद्रात राज्यात आणि आज अखेर सातारा जिल्ह्यात सत्तेत असलेला राष्ट्रवादी पक्ष अथवा सध्याच्या केंद्राच्या राज्याच्या सत्तेतील भाजप ,आणि शिवसेना या सर्व पक्षाना येथील सर्वसामान्य शेतकरी आपल्या करपलेल्या शिवाराकडे पाहत हताश होऊन ” अरे हे सरकार कुठे असते रे,हे सर्व पक्ष मत घेऊन आळीपाळीने सत्तेत तर येतात परंतु पाण्याविना भेगळलेल्या जमिनीत पाणी आणण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणीच धडपडत नाही रे ?कोणी आमचा विचार करणार का नाही? हा सवाल करीत आहेत .
खटाव माण चे राजकारण आजवर फक्त आणि फक्त पाण्यावर आजवर झाले आहे. आपली राजकीय पोळी भाजून पोट भरून ठेकर देणाऱ्या जिल्ह्यातील सर्व झालेल्या आजीमाजी मंत्री,खासदार आमदार यांना आजवर कधीही खटावमांणच्या प्रश्नावर एकत्र येताना पाहिले नाही .निवडणुकीत प्रामाणिकपणे भाबडा विश्वास मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडत आहेत . खरच पाणी आपल्या शिवारात येईल ,या साठी येथील मतदार नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचतात परंतु निवणुकीतील दिलेले आश्वासन पूर्ण न करणाऱ्याला निवणुकीनंतर येथील सर्वसामान्य फक्त एकच प्रश्न विचारतो,”राजकारण राजकारण म्हणजे काय रं भाऊ?” त्याच उत्तर कदाचित हेच असावं ‘ आश्वासन देणं,आणि कुरघोड्या करून पुढच्याला हाणून पाडणे व सर्वसामान्यांना फक्त विकासाचे मृगजळ दाखवणे .”
सातारा जिल्ह्यात छोटी मोठी अशी १२ अथवा त्यापेक्षा जास्त धरणे असताना,खटाव माण आजअखेर तहानलेलाच आहे.हे खरे सातारा जिल्ह्याचे किंबहुना राजकीय नेत्यांच्या दुर्दैव आहे . स्वातंत्र्य कामी आलेले हुतात्मे,महात्मा ,समाजसुधारक यांचे नाव आजही निघते त्याप्रमाणे जिल्ह्यातील लोकनेते स्व भाऊसाहेब गुदगे यांचे नाव खटाव माण चे भगीरथ ‘उरमोडीचे जनक’ म्हणून चिरकाल टिकून राहील.याचप्रमाणे आपले नाव या जगात कोणत्या कामाने लोकांच्या आठवणीत राहील याच भान लोकांच्या लोकप्रतिनिधी ठेवावे .कारण लोकांचे नाव त्यांच्या पोस्टर बाजीने राहत नाही तर त्यांच्या कार्याने लोकांच्या स्मरणात राहते.