भुईंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यात सहभागी होवून श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि केनिया या देशात भारतीय शिष्टमंडळात विशेष जबाबदारी भारतीय विदेश अधिकारी तथा केनियातील भारताचे डेप्युटी हाय कमिशनर राजेश स्वामी यांनी पार पाडली. भुईंज, ता. वाई गावचे सुपूत्र असणार्या राजेश स्वामी यांनी केनिया दौर्यात भारत आणि केनिया या दोन राष्ट्रांमधील मुख्य संपर्क अधिकारी म्हणून गौरवास्पद कामगिरी बजावली. या संपूर्ण विदेश दौर्यासह पंतप्रधानांच्या केनियातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होवून महत्वाची भूमिका बजावत अवघ्या काही महिन्यात दुसर्यांदा पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत विदेश कामगिरीत मोलाची भूमिका बजावण्याची कामगिरी राजेश स्वामी यांनी पार पाडली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेद्वारे परराष्ट्र सेवेत दाखल झालेले राजेश स्वामी हे सध्या केनियातील भारतीय राजदुतावासात डेप्युटी हाय कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या परदेश दोर्यातील शिष्टमंडळात विशेष अधिकारी म्हणून राजेश स्वामी यांनी श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर या देशांना भेटी दिल्या. तर याच दौर्यामध्ये दि. 10 व 11 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केनियाच्या दौर्यावर गेले होते. पंतप्रधानांचा हा दौरा यशस्वी पार पाडण्यासाठी भारत आणि केनिया या दोन्ही राष्ट्रांमधील मुख्य संपर्क अधिकारी म्हणून राजेश स्वामी यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. पंतप्रधानांनी या दौर्यात केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहूरु केन्याटा यांच्यासमवेत चर्चा करुन सात सामंजस्य करारावर सह्या केल्या. केनियात कॅन्सर सेंटर स्थापन करण्याचे जाहीर केले, केनियाची राजधानी असलेल्या नैरोबी येथे नैरोबी युनिव्हर्सिटीत भाषण केले, केनियातील भारतीयांशी मुक्त संवाद साधला, भारतकेनिया बिझनेस फोरमला भेट दिली आणि तेथे त्यांनी मार्गदर्शनही केले, केनिया आणि भारत या देशांमधील ऐतिहासिक संबंधांना उजाळा देवून केनियामध्ये कृषि, उर्जा, वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करण्यास भारत उत्सुक असल्याचे सांगितले. या सर्व व्यस्त वेळापत्रकातील प्रत्येक कार्यक्रमात राजेश स्वामी यांनी पंतप्रधानांसोबत सहभाग घेवून दोन्ही देशांमध्ये मुख्य संपर्क अधिकारी म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी थायलंड येथे कार्यरत असणार्या राजेश स्वामी यांना आपल्या जपान दौर्यातील शिष्टमंडळात सहभागी करुन घेतले होते. राजेश स्वामी यांच्या पंतप्रधानांसमवेतच्या परराष्ट्र कामगिरीबद्दल परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौर्यात भुईंजच्या सुपुत्राची कामगिरी
RELATED ARTICLES