तळमावले : पंढरपूरच्या वारीला वैष्णवाचा मेळा चालला आहे. भक्ती प्रेमरसाची अनुभूती सर्व वारकरी घेत आहेत. आपणही विठ्ठलाच्या सेवेत सेतू बंधातील खारीप्रमाणे सहभागी व्हावे, असा विचार मनात ठेवून चक्क मोरपिसावर जगदगुरु श्रीसंत तुकोबारायांचे सुंदर व मनमोहक चित्र रेखाटून संदीप डाकवे याने आपली भक्ती पंढरीच्या पांडूरंगचरणी रुजू केली आहे.
आपण निसर्गाच्या अविष्काराचा एखाद्या मुर्तीच्या रुपात अनुभव घेत असतो. विविध झाडे, फुले, फळामध्ये विविध देवतांच्या मूर्तीचा आकार पाहण्यास मिळतो. त्याचप्रमाणे अनेक चित्रकार आपल्या कलेच्या जोरावर लहानात लहान कलाकृती बनवत असतात. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील संदीप डाकवे या युवा चित्रकाराने विविध कलाकृती बनवल्या आहेत. सध्या आषाढी एकादशी निमित्त सर्वजण विठूरायाच्या भक्तीत व वारीमध्ये गुंग आहेत.
मोरपिस कागदावर स्थिर ठेवून रंगाचे विशिष्ट मिश्रण करुन पिसावर संत तुकारामाचे चित्र संदीप डाकवे याने साकारले आहे. मोरपिसावर रंगकाम करताना त्याने कल्पकतेचा वापर केला आहे.
संदीपच्या बोटातून उमटणार्या रंग छटांना दाद देण्यासाठी सर्व सामान्य जनतेसह अगदी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गज पुढे सरसावत असतात. डाकवे यांनी सामाजिक बांधिलकीतून डाकेवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेस पाच हजार रुपये किमतीचे शालोपयोगी साहित्य, तक्ते दिले आहेत. आ.शंभूराज देसाई यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप, शिवाय काही दिवस या शाळेच्या बोलक्या भिंती उपक्रमाचेही काम केले आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीची रेखाचित्रे, अक्षरगणेश, शब्दचित्र तयार करुन त्यांना भेट देणे त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत करणे हा छंदही संदीपने मोठया कौशल्याने जपला आहे. याचबरोबर छत्रीद्वारे व्यसनमुक्ती, जटानिर्मुलनासाठी प्रयत्न, शब्दातून चित्रे रेखाटने, विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांत कला प्रदर्शने, खडूमध्ये अष्टविनायक, मोरपीस-जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, पत्राद्वारे मैत्री इ.विविध उपक्रम व राबवले आहेत.
आपल्याजवळील कलेचा उपयोग स्वत:ला व इतरांना आनंद मिळवण्यासाठी व्हावा. त्यातून समाजालाही काहीतरी शिकता यावे हा उद्देश या मागे असल्याचे संदीप यांने सांगितले. सध्या सुरु असलेल्या जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त, व्यसनमुक्ती, जटानिर्मुलन अशा प्रकारच्या विषयातून जनजागृती व समाजप्रबोधन करण्यासाठी संदीपने आपला ब्रश समर्थपणे चालवला आहे. संदीपच्या कलेचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. कलाशिक्षक एन.बी.परीट, जयंत कदम, बाळासाहेब कचरे, अॅड.जनार्दन बोत्रे, वडील राजाराम डाकवे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभते.
चक्क मोरपिसावर संत तुकोबाराय..!
RELATED ARTICLES