भिलार : पाचगणी आणि भिलार परीसरात पावसाचे दमदार आगमन झाले असुन या पावसाने संपूर्ण परीसराचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती. शेतकरी राजा दमदार पावसाच्या अपेक्षेत होता. गेले दोन दिवसापासुन पडत असलेल्या मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला आहे तर पर्यटकांनी मात्र पर्यटनस्थळांवर मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.
महाराष्ट्रासह देशात सर्वत्र पाऊस कोसळत असताना महाबळेश्वर व पाचगणी ही अतीपावसाची गिरीशिखरे त्याच्या येण्याची वाट पहात होती. गेले दोन दिवसापासुन सलग पाऊस कोसळत असुन धरण क्षेत्रातही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी पाचवडहून पाचगणीकडे येणार्या मुख्य रस्त्यावर पिंपळी( ता.जावली) येथे एक महाकाय बाभळीचे झाड ,काटवली (ता.जावली) येथे गुलमोहराचा एक वृक्ष आणि पाचगणीच्या संजीवन हायस्कूलजवळील एक वृक्ष असे तीन वृक्ष मुळासकट उन्मळून रस्त्यातच पडल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प होती. त्यामुळे पाचगणी व पाचवडकडे जाणार्या चाकरमान्यांचे मात्र यामुळे हाल झाले. नागरीकांनी हे सर्व वृक्ष अथक परीश्रमानंतर काढल्यानंतर आज दुपारी 1 वाजता ही वाहतुक सुरू झाली.
तीन दिवसाच्या सलग पावसाने महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परीसरातील रस्ते पाण्याने भरून वहात होते. तर दोन्ही शहरातील डोगंरपरीसरातील छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळावर शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली होती.
पर्यटकानंी मात्र या पावसात मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद लुटला. तर बाजारपेठेत गरमागरम चहा, मक्याची कणसे, भजी खाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. तर पहील्याच पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. अधीकार्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांच्या नादुरूस्तीने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाचगणी क्लब व पाचगणी ग्रामीण रूग्णालयासमोर ठेकेदाराने खोदलेला रस्ता पुन्हा उखडल्याने येथे वाहने जोरदार आपटत असल्याने धोका निर्माण झाला आहे. या ठिक़ाणी दुचाकीचे छोटे मोठे अपघात वारंवार होत आहेत. यावर अधिकारी केव्हा लक्ष देणार असा सवाल नागरिक व वाहनचालक विचारत आहेत.