सातारा : कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव सदस्य संख्या अभावी फेटाळला गेल्याने प्रतिष्ठेचा प्रश्न केलेल्या राष्ट्रवादीला चांगलाच जोरदार झटका बसला. काँग्रेसने आपल्या सदस्यांना गैरहजेरीचा व्हीप बजावून आधीच मोर्चे बांधणी केल्याने शिवाजी शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याची घोषणा पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केली. तर उदयनराजे गटाच्या तीन सदस्यांनी या विशेष सभेकडे पाठ फिरवली. या ठराव प्रकरणाचा राजकीय वर्तुळात चांगलाच गवगवा झाला. जिल्ह्याचा राजकारणाचा रिमोट आपल्या हाती ठेवणार्या विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही आत्मपरिक्षणाची वेळ ओढवली आहे. सभापती बंगल्यापासून ते जिल्हा परिषदेच्या सभागृहापर्यंत दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. संध्याकाळी उशीरा कृषी सभापती शिंदे यांना व्हीप आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने निलंबनाची नोटीस बजावली.
पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी शिवाजी शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव सिध्द करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी दुपारी 1 वाजता विशेष सभा बोलवली होती. या सभेत राष्ट्रवादीला अविश्वास ठरावासाठी 44 सदस्य संख्या गाठणे आवश्यक होते. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागून राहिले होते. राष्ट्रवादीच्या सर्व 38 सदस्यांना मतदानात सहभाग घेता यावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या बंगल्यावर तातडीची बैठक घेऊन सर्व सदस्यांना व्हीप काढला. या बैठकीला आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब भिलारे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भोसले, राज्य संघटक बाळासाहेब महामुलकर आदी यावेळी उपस्थित होते.
बंगल्यावरील बैठकीनंतर राष्ट्रवादीची मग राजकीय रणनिती सुरु झाली. बेरजेच्या राजकारणासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माजी आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा पाठींबा मिळावा म्हणून वाटाघाटी केल्या. मात्र काका गटाने तटस्थ भूमिका घेतल्याने ऐनवेळी राष्ट्रवादीची गोची झाली. काँग्रेसने सदस्यांना अनुपस्थितीचा व्हीप बजावून सुध्दा काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभना गुदगे, अतुलबाबा भोसले गटाचे राजकुमार पवार, अनुराधा लोकरे या तिघांचा राष्ट्रवादीला पाठींबा मिळाला त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 36 पर्यंत वाढले. 8 सदस्यांच्या बेरजेसाठी राजकीय नेते मंडळीची अक्षरश: कसरत सुरु होती. मात्र उदयनराजे गटाने ऐनवेळी सभेकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीला 44 चा जादुई आकडा गाठता आला नाही. अमृत नाटेकर यांनी दुपारी 1 वाजता मतदान प्रक्रिया सुरु केली. या सभेला राष्ट्रवादीचे 34 सदस्य उपस्थित राहिले. सभेमध्ये तीन वेळा घंटानाद करण्यात आला. नंतर दोन सदस्य उपस्थित झाले. आवश्यक गण संख्या गाठता न आल्याने हा अविश्वास ठराव बारगळल्याचे नाटेकर यांनी 1.30 वाजता जाहीर केले. सायंकाळी 4 वाजता हा ठराव राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्याचे पीठासन अधिकार्यांच्यावतीने सांगण्यात आले.
चौकट
रामराजेंवर अंर्तमुख होण्याची वेळ
सत्तेच्या राजकारणात काँग्रेसला नेहमीच काठावर ठेवणार्या राष्ट्रवादीला आज काँग्रेसने चांगलाच धोबी पछाड दिला. काका गटाने तटस्थता दाखवली. तर बाबा गटाने सदस्यांना व्हीप बजावून अज्ञातस्थळी रवाना केले त्याला उदयनराजे गटाच्या तीन सदस्यांची साथ मिळाली. व सदस्य संख्या अभावी राष्ट्रवादी अपेक्षित संख्याबळ सत्तेत असूनही गाठू शकली नाही. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांना या प्रकरणात जबरदस्त झटका बसला आहे. राष्ट्रवादीने अविश्वास ठरावाचा मुद्दा नको इतका प्रतिष्ठेचा केल्याने सर्वच परिस्थिती हाताबाहेर गेली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर या राजकीय नाट्यात पक्षाला चांगलाच सेटबॅक बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.