सातारा : सातारा जि.प. कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावेळी मतदान प्रक्रियेत सहभाग न नोंदविल्याबाबत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा.श्री.छ. उदयनराजे भोसले गटाचे तीन जि.प. सदस्यासह व अन्य इतर दोन सदस्य असे एकुण पाच जणांवर पक्षविरोधी भुमिका घेतल्याबद्दल त्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने व जि.प.अध्यक्ष सुभाष नरळे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.
साविआचे जि.प. सदस्य संदीप शिंदे, उपाध्यक्ष रवि साळुंखे, जि.प.सदस्या सौ वनिता पोतेकर, जि.प. कृषी सभापती शिवाजीराव शिंदे , राहुल कदम या पाच जणांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 38 सदस्य आहेत. या सर्व सदस्यांना विधान सभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सहीचा व्हीप रजिस्टर पोस्टाने यापूर्वीच पाठविण्यात येऊन सर्व सदस्यांना अविश्वास ठरावाच्या वेळी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी पाच सदस्य गैर हजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आपण गेल्या 17 वर्षापासून राजकारणात असून राज्याचे व जिल्ह्याचे नेतृत्व करणारे विधान सभा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जि.प. अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली असल्याची जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे यांनी स्पष्ट करून सांगितले. काँग्रेसचे काही सदस्य आमच्या संपर्कात होते. यांच्या पाठिंब्यावर आम्ही अविश्वास ठराव जिंकू असा विश्वास आम्हाला होता. शेवटच्या दोन दिवसात आम्ही काँग्रेसच्या सदस्यांचया संपर्कात आलो होतो.
1999 पासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. पक्षाची प्रतिमा व ताकद वाढविण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केलेले आहे. असे जि.प. अध्यक्ष सुनिल माने यांनी स्पष्ट करून म्हणाले जिल्ह्याचे नेते ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी घेतलेली भुमिका ही योग्यच होती. पक्षातील गद्दारांना धडा शिकविण्यासाठीच अविश्वास ठराव आणला होता. जरी हा अविश्वास बारगळला असला तरी आम्ही आता कायद्याचा आधार घेऊन भविष्य काळात न्यायालयीन लढाईत कृषी सभापती शिवाजीराव शिंदे सह जि.प. उपाध्यक्ष रवि साळुंखे, संदीपभाऊ शिंदे, राहुल कदम, वनिता पोतेकर यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई शंभर टक्के करणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये तडजोड होणार नाही.
आज झालेल्या अविश्वास ठरावावेळी गद्दारांनी पाठ फिरवल्यामुळे आमचा जरी पराभव झाला असला तरी हा नैतिक पराभव आम्ही स्वीकारला आहे. मात्र आमचा लढा पुढे कायम सुरूच राहणार आहे. न्यायालयीन आधार घेवून कोणत्याही परिस्थितीत कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांना पदावरून हटविणारच अशी भुमिका राष्ट्रवादीची कायम राहणार आहे असे यावेळी ठामपणे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे संघटक बाळासाहेब महामुलकर उपस्थित होते.