सातारा : महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना व कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कर्नल आर डी निकम यांच्या 95 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, कॅप्टन उदाजी निकम, सुभेदार शंकर दळवी, सौ. पुष्पा निकम, कर्नल प्रकाश देवल, ज्येष्ठ पत्रकार जयवंत गुजर यांनी दीपप्रज्वलन केले. बँकेचे संचालक पेटी ऑफिसर अश्पाक पटेल यांच्या रक्तदानाने रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.
आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार जयवंत गुजर म्हणाले, निवृत्तीनंतर कर्नल साहेबांनी माजी सैनिकांच्या कल्याणाचा जो ध्यास घेतला त्यातून संघटना, बँक, सातारा, कवठेमंहकाळ, चिपळूण, महाड येथे सी एस डी कॅन्टीनची स्थापना केली. दुस-या महायुध्दातील सैनिकांना, विधवांना राज्यशासनाकडून अनुदान, आमदार फंडातून समाज मंदिरे, सांस्कृतिक भवने व स्मशानभूमी इत्यादी समाजपयोगी वास्तू उभारल्या गेल्या. प्रत्येक सैनिकासाठी आवश्यक असलेली वन रँक वन पेन्शन योजना हाती घेवून ती शासनाला पटवून देण्याचे काम कर्नल साहेबांनी केले. त्यांच्या हयातीत ही योजना मंजूर झाली असती तर त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असता. त्यांनी केलेले हे काम महाराष्ट्रातच नाही तर देशभर पोहचले आहे. सीमेवर रक्त सांडणा-या सैनिकासाठी, कर्नल साहेबांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेवून रक्तदाते त्यांच्या रक्ताची परत फेड करत आहेत.
अध्यक्षीय भाषणात कॅप्टन उदाजी निकम म्हणाले, दादांच्या कार्याची आठवण रहावी म्हणून आपण या रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी करत असतो. याचबरोबर कर्नल साहेबांच्या पुण्यतिथी दिनी सैनिक स्वच्छ भारत अभियान राबवत असतो. बचत गटांच्या माध्यमातूनही अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. आपण सैनिक देशभर फिरलो आहोत, त्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हायला पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. रक्तदानाच्या या उपक्रमास याहीपेक्षा मोठा प्रतिसाद मिळायला पाहिजे, परंतु काही लोक काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करतात. परंतु आज या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रक्ताची गरज भासू शकते. आज आपण रस्त्याने जाताना पहातो अॅम्ब्युलन्सला पुढे जाण्या करीता जागा दिली जात नाही मात्र व्ही आय पी साठी पोलीस तैनात असतात. ही मानसिकता समाजाने बदलली पाहिजे. कॅप्टन निकम यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.
कर्नल आर डी निकम यांच्या 95 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर सुरु असताना मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अचानक भेट देवून उपस्थितांना सुखद धक्का दिला. रक्तदात्यंाची विचारपूस करून कॅप्टन निकम यांना या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद देवून कर्नल आर डी निकम यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
या रक्तदान शिबिरात स्काऊट गाईड मधील कर्मचारी, एन सी सी मधील कर्मचारी, कारखान्यातील कामगार, शेतकरी, आजी माजी सैनिक, बँकेचे संचालक व सेवक, व्यापारी, ग्राहक व हितचिंतक इत्यादी विविध स्तरातील रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन माउली ब्लड बँकेने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे महाव्यवस्थापक यशवंत देसाई यांनी केले व कॅप्टन गोपाळ गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, बँकेचे संचालक, कर्मचारी, आजी माजी सैनिक उपस्थित होते.