सातारा : रयत शिक्षण संंस्थेकडून प्रती वर्षी जुन महिन्याच्या प्रारंभी व दिवाळी सुट्टीनंतर संस्थेअंतर्गत सेवकांच्या बदल्यांचे सत्र हे सुरूच असते. होणार्या बदल्यांसाठी सेवकांचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. मात्र संस्थेंकडे शासनाच्या ध्येय धोरणानुसार व मार्गदर्शक तत्वानुसार सेवकांच्या बदल्यांसदर्भात कोणतीही नियमावली नाही. सर्व सेवकांना न्याय मिळेल व कोणावरही अन्याय होणार नाही. बदल्यांच्या प्रकीयेत काही दलांलाचा हस्तक्षेप होत असल्याने संस्थेची बदनामी होत आहे. संस्थेची बदनामी टाळण्यासाठी बदली प्रकीयेमध्ये पारदर्शकता येईल अशा प्रकारची सर्वसमावेशक नियमावली असावी. अशी मागणी रयत सेवक मित्र मंडळ संघटनेच्यावतीने संस्थेचे सचिव कराळे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
संघटनेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, रयत शिक्षण संस्थेचे जाळे हे राज्यभर पसरलेले आहे. कोणत्याही जिल्ह्यात सेवक प्रामाणिकपणे काम करत असतो. संस्थेकडून दरवर्षी बदली प्रकीया राबविली जाते. मात्र राबविलेल्या बदली प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करणार्या सेवकांवरच अन्याय होत आहे. काही सवेक एकाच ठिकाणी रहाण्यासाठी दलालाना हाताशी धरून कार्यभार साधत असतात. अशा प्रकारांमुळे आज संस्थेची बदनामी होत आहे. होणारी बदनामी टाळण्यासाठी आणि बदली प्रकीयेत पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने नियमावली तयार करून शासन व इतर संस्थापुढे आदर्श निर्माण करावा. शिक्षक बदली प्रकीया ही शासन ताब्यात घेण्याच्या विचाराधीन आहे. अशावेळी ही प्रकीया संस्थेच्या हातात राहावी असे सेवकांचे मत आहे. तसेच बदली प्रकीय ही संस्थेने विभागवार न राबवता केंद्रीय पातळीवर एकत्रीत राबवावी, बदली प्रकीय ही ऑनलाईन व पारदर्शक असावी, सेवकांचा होम अॅड्रेस लक्षात घेवून सोयीने देण्याचा प्रयत्न व्हावा, महिला, अपंग यांचा प्राधान्याने सहानुभूतीने विचार व्हावा, पती-पत्नी एकत्रीकरण व्हावे, शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणेच विभागाबाहेर व जिल्ह्याबाहेर काम करणार्या सेवकांना सेवा ज्येष्ठतेनुसार बदलीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, शहरी व ग्रामिण भागात काम करण्यासाठी कालावधी ठरविण्यात यावा, संस्थेने व प्रशासनाने बदली हा अधिकार म्हणून न वापरता सेवक हिताच्या दृृष्टीने विचार करावा. याशिवाय डी.एडवरून बी. एड, ए. टी. डीवरून ए. एम. पदोन्नती लवकरा लवकर देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसह संघटनेच्या वतीने 25 नियमांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना संघटनेचे माजी अध्यक्ष शरद यादव, मार्गदर्शक अरविंद खराडे, संघटनेचे सचिव नंदकिशोर गायकवाड, पिलगरसर, श्रीमती शिंदे, निखील सलामे, बापूसाहेब काळे, शाम भोये, नवनाथ आडे, सुहास भावसार, विकास गायकवाड, प्रविण निलकंठ, किरण चव्हाण, अशोक रणखांब, भिमा लेंभे, शिवाजी मराडे, प्रविण रहाणे, संजय शिंदे, मंगेश वडेकर यांच्यासह राज्यभरातून सर्व संपर्कप्रमुख व समन्वयक, कार्यकर्ते, सेवक उपस्थित होते.