भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या छ. शाहु कुस्ती केंद्रामध्ये सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विविध वजनी गटातील शालेय मुलामुलींच्या कुस्ती स्पर्धांना प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाटन माजी खासदार व किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते झाले.
यावेळी गजानन बाबर म्हणाले, ग्रामीण भागातील कुस्ती क्षेत्राला चालना देण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या दुरदृष्टीतुन किसन वीर परिवाराने छ. शाहू कुस्ती केंद्राची उभारणी केलेली आहे. कोणत्याही स्पर्धेत जिंकण्याची भावना ठेवल्यास यश निश्चित मिळते.आज ग्रामीण भागातुन धावपटू ललिता बाबर सारखे गुणवंत खेळाडु देशाचे नाव जगात पोहचवित आहेत, त्यांचा आदर्श तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी घेतल्यास गावागावातुन यशस्वी खेळाडु घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे आणि कुस्ती मॅटचे पुजन करण्यात आले. महाराष्ट्र केसरी पै. शिवाजीराव पाचपुते यांच्या हस्ते सलामीची कुस्ती लावुन स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी तालुक्यातील 14 ते 19 वयोगटातील मुलामुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला असुन यातुन प्राविण्य मिळवणार्या स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक मधुकर नलावडे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, सचिन सांळुखे, प्रविण जगताप, राहुल घाडगे, विजय चव्हाण, महाराष्ट्र केसरी पै. शिवाजीराव पाचपुते, मंगलसिंग डाळवाले, आबा डोंगरे, मोहन वस्ताद, अशोक देवकर, मनोहर पटवर्धन, एन.आय.एस.कोच दत्तात्रेय माने, राजेंद्र कणसे, राहुल शिंदे, रोहीत भोसले, एन.बी.ईनामदार, आकाश शेडगे, शिवराज जाधव, अमृत जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन लेंभे यांनी तर स्वागत व आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.एस. दोरगे यांनी मानले.