सातारा : राष्ट्रवादी भवनात शनिवारी झालेल्या जनता दरबारात 152 तक्रारी दाखल झाल्या. यावेळी पहिल्यांदाच जमीन फसवणूकीच्या अनुषंगाने काही तक्रारी दाखल झाल्याची माहिती कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदेे यांनी जनता दरबार संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सातारा येथील राष्ट्रवादी भवनात दोन महिन्यानंतर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. दोन महिन्यांच्या कालखंडानंतर जनता दरबार झाल्यामुळे आणि स्वत: आ. शिंदे या तक्रारी ऐकून घेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच सातारा शहरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने आपल्या तक्रारी घेऊन येथे गर्दी केली होती.
दुपारी बारा वाजता सुरु झालेला जनता दरबारात स्वत: आ. शिंदे तक्रारी ऐकून घेत होते आणि त्याबाबत संबंधित विभागाशी मोबाईलवर संपर्क साधून कामांचा, तक्रारीचा निपटारा तत्काळ करण्याच्या सूचना करत होते. 152 पैकी 70 हून अधिक तक्रारींचा जागेवरच निकाल लावण्यात आला.
दरम्यान, जनता दरबार संपल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी जिल्हाध्यक्षांच्या दालनात पत्रकारांशी बातचित केली. त्यामध्ये त्यांनी 152 तक्रारी दाखल झाल्याचे सांगत बहुतांशी तक्रारी महावितरण, शैक्षणिक आणि नोकरीच्या अनुषंगाने असल्याचे स्पष्ट केले. आ. शिंदे म्हणाले, पॅनकार्ड क्लबने केलेली फसवणूक तसेच चिटफंडच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या तक्रारी आहेत. गेल्यावेळी झालेल्या जनता दरबारातही या अनुषंगाने तक्रारी दाखल झाल्या होत्या. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जमीन फसवणूकीच्या अनेक तक्रारी आहेत. त्याबाबतही आम्ही संबंधित विभागाला सूचना करून त्याची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर, मनोज पोळ, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षांच्या दालनातच दिला आत्मदहनाचा इशारा
राष्ट्रवादी भवनात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोर तक्रारदारांनी एकच गर्दी केली होती. याचवेळी त्यांच्याकडे सातार शहरातील एक तक्रारदार आपले गार्हाणे घेऊन आला होता. दरम्यान, संबंधित तक्रारदार त्याची तक्रार घेऊन येण्यापूर्वी गेल्या जनता दरबारात त्याच तक्रारदाराची तक्रार घेऊन एक महिला येऊन गेल्याची माहिती येथे देण्यात आली. त्यामुळे हा प्रश्न आपण समन्वयाने सोडवू, अशी ग्वाही संबंधित तक्रारदाराला आ. शिंदे यांनी दिली. तरीही तक्रारदार ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे त्याने संतापाच्या भरातच जर मला न्याय नाही मिळाला तर मी तुमच्यासमोरच आत्मदहन करेन, अशा इशारा त्यांने दिला. यामुळे आ. शिंदे आणि येथे उपस्थित असणारे तक्रारदार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अवाक झाले. यानंतर मात्र, आ. शिंदे यांनी संबंधित महिला आणि तक्रारदारांनी एकत्रित बसून तोडगा काढू आणि हा प्रश्न कायमचा मिटवून टाकू अशी ग्वाही दिल्यानंतर संंबंधित तक्रारदारही शांत झाला.