सातारा : कराड अर्बन बँकेने पर्यावरण प्रबोधनासाठी आयोजित केलेला सायकल रॅलीचा उपक्रम स्तुत्य असून बँकेचे हे कार्य सर्व समाज घटकांपर्यंत निश्चितपणे पोहोचेल असे गौरवपूर्ण उद्गार कोरेगावचे प्रांताधिकारी अजय पवार यांनी काढले. ते कराड अर्बन बँकेने शताब्दी महोत्सवानिमित्त सातारा शहरात आयोजित केलेल्या सायकल रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले.
यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे संचालक विद्याधर गोखले, प्रा, बाबुराव रायवाड, राजेंद्र कुंडले, सौ, मंजिरी ढवळे, सौ, कोडगुले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, सातारा हिल मॅरेथॉनचे व्ही.एस.जाधव, चंद्रशेखर घोरपडे, वासुदेव काशिकर, कर सल्लागार अरूण गोडबोले, अतुल दोशी, मा.ना.देशमुख, दिलीप शहा, विजय आगटे, नगर वाचनालयचे डॉ.बडवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले की, बँकेने शताब्दी महोत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले असून त्यापैकीच सातारा येथील हा उपक्रम आहे. बँक सातारमधील ज्या समाज घटकांबरोबर आर्थिक व्यवहार करते त्या घटकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून आपण पर्यावरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला आहे. या सायकल रॅलीस सातारकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला ही बाब आनंददायी अशी आहे.
यावेळी सातारा हिल मॅरेथॉनचे व्ही.एस.जाधव म्हणाले की, कराड अर्बन बँक ही सातारा जिल्ह्यातील अग्रणी व आदर्श अशी बँक आहे. बँकेचे सामाजिक कार्य खुप मोठे आहे. बँकेच्या या कार्यास सातारकरांची नेहमीच साथ राहील. बँकेची प्रगती आणि उपक्रमशीलता यामुळेच बँकेस लौकीक प्राप्त झाला आहे.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी प्रास्ताविक केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, बँकेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील असून सामाजिक कार्याची प्रेरणा घेवून बँकेने आजवर अर्थकारणाबरोबर सामाजिक कार्याचाही वसा चालविला आहे. या सामाजिक कार्याची भावना संचालक व सभासदांमध्ये असल्याने आपला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. बँकेच्या सामाजिक कार्याची ओेळख सातारकरांना व्हावी, पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी यासाठी सायकल रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला असून सातारकरांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सातारकरांचे आभार मानले.
सातारा शहरातील ही सायकल रॅली पोलीस करमणूक केंद्रापासून सुरू होवून बँकेची सातारा शहर शाखा, राजवाडा, मोती चौक, पोवई नाका शाखा, पोवई नाका, अजिंक्य कॉलनी, कुबेर गणपती, आर.टी.ओ. ऑफीस, बँकेची सदर बझार शाखा, जिल्हा परिषद चौक, साई बाबा मंदीर, पोवई नाका, पोलीस करमणूक केंद्र या मार्गावरून संपन्न झाली. या मार्गावर ठिकठिकाणी रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. रॅलीच्या मार्गावर फुलांच्या पाकळ्या टाकून सायकल स्वारांचे स्वागत करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये 10 वर्षाच्या मुलांपासून 70 वर्षाच्या वृध्दांपर्यंत जवळपास 700 सायकल स्वार सहभागी झाले होते.
सायकल रॅलीनंतर झाले कार्यक्रमात युवराज पवार, प्रतिक्षा पोळ, पल्लवी नाईक, विजय ढाणे, उज्वला सोनवणे, आशिष जेजूरीकर, मधूकर देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांचा रोप देवून सत्कार करण्यात आला. सायकल रॅलीचे नियोजन सायकल रॅलीचे प्रमुख बँकेचे सातारा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील, शशिकांत कुंभार, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधव माने, शताब्दी विभागाचे विभागप्रमुख सुनिल कुलकर्णी, पोवई नाका शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन कोडगुले, नितीन चाफेकर, विजय नलवडे, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक बापू यादव, मार्केटींग विभागाचे व्यवस्थापक सुहास पवार, शताब्दी विभागाचे अधिकारी बसवेश्वर चेणगे, चंद्रकांत चव्हाण, गिरीश करंदीकर, सातारा विभागातील विविध शाखांचे शाखा व्यवस्थापक, अधिकारी, सेवक यांनी चांगल्या पध्दतीने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेच्या सातारा विभागाचे विभागप्रमुख विजय काकडे यांनी केले. शेवटी बँकेच्या रहिमतपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक संतोष गायकवाड यांनी आभार मानले.