महाबळेश्वर : महाबळेश्वर पांचगणी रस्त्यावर अवकाळी गावाच्या हद्दीत एक मारूती वॅगनआर या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटुन गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मातीच्या ढिगावरून उडुन मोठया झाडावर आदळली. या अपघातात ओंकार क्षीरसागर हा 19 वर्षाचा युवक जखमी झाला.
रस्त्यावरून प्रवास करीत असलेल्या इतर वाहनांतील नागरिकांनी ओंकार याला अपघातग्रस्त वाहनातून काढुन पांचगणी येथील बेल एअर या रूग्णालयात दाखल केले. गेल्या चार महिन्यांपासून या भागत अपघातांची मालिकाच सुरू आहे. या मालिकेत या अपघाताची भर पडली आहे हा भाग पांचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या अपघाताची खबर नागरिकांनी पांचगणी पोलिसांनी दिली आहे. महाबळेश्वर पासून 9 कि मी अंतरावर अवकाळी व बोंडारवाडी बस स्टॉप दरम्यान सरळ रस्त्यावर हा अपघात झाला. ओेंकार क्षीरसागर हे महाबळेश्वरकडे येत होते. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ओंकारचा वाहनावरील ताबा सुटला व बाजुच्या मातीच्या ढिगावर चढुन वेगात ही गाडी पुढील दाट झाडीत आदळली. सुदैवाने या अपघातातून ओेंकार आश्चर्यकारकरित्या वाचला.
अपघातात गाडीच्या मागील व पुढील भागाचा पुर्ण चक्काचूर झाला असून या गाडीकडे पाहिले असता या अपघातातून कोणी वाचले आहे यावर विश्वास बसत नाही परंतु वेळ आली होती परंतु काळ न आल्याने सुदैवाने ओंकार याचे प्राण वाचले आहेत. त्याचेवर पांचगणी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.