पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मी प्रथमच खेळत होते. त्यामुळे अनुभव कमी पडल्याचे निकर्षाने जाणवले. परंतू सरकारकडून सर्व सुविधा ऑलिम्पिक स्पर्धेला जाणार्या खेळाडूंना मिळाल्या तर नक्कीच महाराष्ट्राला पर्यायाने देशाला जास्तीत जास्त पदके मिळतील, अशी अपेक्षा ऑलिम्पिकपटु ललिता बाबर हिने व्यक्त केली.
क्रीडा व युवकसेवा संचालनालयाच्या वतीने क्रीडा आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते ललिता बाबरचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती. याप्रसंगी मोरया ढोल-ताशा पथकाच्या वतीने ललिता बाबर हिचे म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कोकणचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक माणिक ठोसरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, काका पवार, तेजस्विनी सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांसह संचालनालयाचे सर्व अधिकारी, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.
बाबर पुढे म्हणाली की, देशाला पदक मिळून न दिल्याबद्दल नाराजीचे वातावरण असेल, अशी मला खात्री होती. परंतू माझ्या कामगिरीबद्दल क्रीडापटुंमध्ये असलेली भावना पाहुन आनंद झाला. आगामी 2020 मध्ये टोकियो येथे होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मी नक्कीच भारताला पदक मिळवून देईल. प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्याने मला अनुभव नव्हता. त्यामुळे मला शेवटच्या टप्प्यात पायाला दुखापतही झाली. परंतू पदक जिंकण्याच्या उद्देशानेच मी खेळलेली होती.