सातारा : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतर लक्झरी बसला पाठीमागुन भरधाव येणार्या दूध टँकरने जोरदार धडक दिल्याने बस पुढील ट्रकवर आदळली . हा ट्रक दुसर्या ट्रकवर आदळला. या अपघातात नागपुरहुन सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी व बस आणि टॅकरचालक जखमी झाले . एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, बुधवार दि. 29 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खांबाटकी बोगदा ते धोम -बलकवडी कालव्याच्या मध्ये महामार्गावर चार वाहनांचा अपघात झाला. खांबाटकी बोगदा ओलांडून पुणे बाजूकडे जाताना उतारावर काही वाहने थांबली होती. समोर वाहने थांबल्याने लक्झरी बसचालकाने बस थांबवली. त्याचवेळी पाठीमागुन भरधाव वेगात आलेला दूध टँकर ब्रेक न लागल्याने बसच्या पाठीमागील बाजूवर आदळून डाव्या बाजूच्या कठडयास धडकला. टँकरच्या जोरदार धडकेने बस पुढे उभ्या असलेल्या कोंबडया भरलेल्या ट्रकवर आदळली . त्यामुळे ट्रक दुसर्या ट्रकला धडकला. या अपघातामुळे रस्त्यावर काचा , बसमधील विद्यार्थ्यांच्या बॅगा, वस्तू विखूरल्या गेल्याने आणी दोन्ही वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्याने वाहतुक ठप्प झाली.
घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याच्या सपोनि स्मीता पाटील, सपोनि मोहन कदम, शिरवळचे सपोनि सुनिल पवार, पो. हवालदार अमोल मर्ढेकर, विजय पिसाळ, भोईटे, यादव, मुठे आदी घटनास्थळी हजर झाले. जखमी विद्यार्थ्याना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावर विखुरलेल्या काचा व इतर साहित्य बाजूला काढून रस्ता खुला केला. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
अपघातातील जखमी : भाविक अशोक बांते , ओम नगर सकरदरा नागपूर ( 15 वर्ष ) गंभीर जखमी, कार्तिक किशोर ठाकरे (15 वर्ष), आनिक्षा विजय घायवाट ( 20 वर्ष), संगिता गजानन पारतवार (60 वर्ष), कमलाबाई तोलाराम सुतोणी (65 वर्ष), अग्नी अनिल राऊत (20 वर्ष), देवेंद्र रमेश चौधरी (21 वर्ष), चुन्नाराम सलामी (वय 28) मध्यप्रदेश, क्लीनर बस , मयुरी काशीनाथ लोनगाडगे (वय 20), प्रणय अरुण शिवणकर (वय 15), हर्षल लीलाधर बांते (वय 15), रागीनी विनोद देवडे (20 वर्ष), सतिश सुभाष शेटे (32 वर्ष) नवे पारगांव, हातकणंगले कोल्हापूर टँकर ड्रायव्हर, बाळकृष्ण रामनरेश विश्वकर्मा (49 वर्ष) बसचालक हे जखमी झाले आहेत.