सातारा: समीक्षा ही प्रक्रिया खूप व्यापक आहे. ती नेहमीच सत्ताधार्यांच्याविरोधात उभी राहते. ती लोकप्रिय नसली तरी विचार निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये असते. अर्थपूर्ण, सुसंगता, न्याय शोधण्याची इच्छा समीक्षेत असते. जागतिकीकरणानंतर समीक्षेसाठी असणारी संस्थात्मक अवकाशे शिक्षणसंस्था आणि वाचनालयाचा र्हास होत असून ही खेदाची बाब असल्याचे मत विभागीय समीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी व्यक्त केले.
मसाप, शाहुपुरी शाखा आणि छत्रपती शिवाजी कॉलेज मराठी विभाग सातारा यांच्या सहकार्यातून छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेल्या दोन दिवसीय विभागीय समीक्षा साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मसाप पत्रिकेचे संपादक पुरुषोत्तम काळे, किशोर बेडकिहाळ, निमंत्रक विनोद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, मसाप प्रतिनिधी राजन मुठाणी, छ. शिवाजी कॉलेजच्या उपप्राचार्या मुजावर, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवलिंग मेणकुदळे आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. थोरात पुढे म्हणाले, दोन दिवसीय समीक्षा साहित्य संमेलनात जाणीवपूर्वक विविध वयोगटातील शोधनिबंध लिहिणार्यांना स्थान देण्यात आले. त्यातून आशादायक चित्र उभे राहिले आहे. समीक्षक हा शब्द मोठा असून समीक्षा ही प्रक्रिया व्यापक आहे. हा लोकप्रिय प्रकार नसून ती अनेकांना आवडत नाही. चौकटी मोडण्याचे काम समीक्षा करते. समीक्षा सत्तेला सहन होईलच असे सांगता येणार नाही किंबहुना ती तसा विचार करत नाहीत. ती शब्दानंतर निर्माण झालेली असते. त्यामुळे एकवाक्यता, अंतिम मान्यता असे होत नाही. प्रश्न उभे करणे, प्रतिसाद देणे ही समीक्षेची कार्य आहे. ती दुसर्या कुणाच्यातरी उक्तीनंतर जन्माला येते त्यामुळे बंदिस्त अवकाश खुले होतात. प्रकाशित साहित्याने वातावरण निर्मिती होत नाही परंतु समीक्षेमुळे निर्माण होते. ती साहित्य, संस्कृतीबद्दल अधिक विचार करायला लावते. ज्या क्षेत्राची समीक्षा होते त्याची जडणघडण त्यामुळे होते.
समीक्षेसाठी लागणारी संस्थात्मक अवकाश गेल्या काही वर्षात नष्ट होत आहेत. शिक्षण संस्था आणि वाचनालय ही ती दोन अवकाश असून या यंत्रणा वेगाने नष्ट होत आहेत. जागतिकीकणाच्या काळानंतर संस्कृतीची पोकळ चिन्हे निर्माण झाली असून ती वेगाने वाढत आहेत. पण या सर्वात बदल घडवून आणण्याची शक्यता समीक्षेमुळे वाढते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही संकल्पना मह्तवाची असून त्याच्या समीक्षेव्दारे विधायक, व्यापक परंपरा उभी करता येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मसापपत्रिकेचे संपादक पुरुषोत्तम काळे म्हणाले, समीक्षा साहित्य संमेलन कसे असावे याचा वस्तुपाठ या संमेलनाने घालून दिला. आयोजनात कमीत कमी क्लिष्टता होती. समीक्षा हा विषय रुक्ष वाटत असला तरी त्याचा दृढ संबंध प्रत्येकाशी असता. सामूहिक अभिरुची घडवण्याचे काम आपल्याकडे होत नाही हा प्रश्न आहे. साहित्य, राजकारणासह सर्व क्षेत्राची समीक्षा झाली पाहिजे. गेल्या दीड वर्षात मसापने जाणीवपूर्वक रुढ प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. या संमेलनात सादर झालेल्या शोधनिबंधाचे पुस्तिक अथवा स्मरणिका करावी. समीक्षा संमेलन कसे व्हावे याची मुहुर्तमेढ सातार्यातील संमेलनाने घालून दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. अनिसा मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या समारोपाचे प्रास्ताविक जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. दोन दिवसाच्या संमेलनात समीक्षेची संकल्पना आणि कार्य, समीक्षा आणि आंतरविद्याशाखीयता, समीक्षा व्यवहाराचे विविध पैलू, समीक्षा व्यवहार आणि लेखकाची संकल्पना, साहित्य समीक्षा आणि वाचक, समकालीन मराठी समीक्षा या विषयावर परिसंवादात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. त्याचप्रमाणे विविध ठिकाणाहून आलेल्या समीक्षक अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी मसाप शाहुपुरी शाखेचे कार्यकारिणी कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाह अॅड. चंद्रकांत बेबले, कार्यवाह डॉ. उमेश करंबळेकर, कोषाध्यक्ष राजेश जोशी, प्रवीण पाटील, सुभाषचंद्र सरदेशमुख, संजय माने, अमर बेंद्रे, दीपाली धुमाळ, फातिमा नदाफ, स्थानिक संयोजन समितीचे समन्वयक प्रा.गजानन चव्हाण, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. कांचन नलवडे, सहसंयोजक डॉ. मानसी लाटकर, डॉ. संजयकुमार सरगडे, प्रिं. सिताराम गोसावी, दि गुजराथी अर्बन को-ऑप सोसायटीचे कर्मचारी वृंद आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मचारी वृंदांनी सहभाग नोंदवला.