महाबळेश्वर : आज पुन्हा अवकाळी गावाच्या हद्दीत पांचगणी येथून शाळेतील विद्यार्थ्यांना घेवून महाबळेश्वरकडे निघालेल्या काळी पिवळी वडाप वाहतुक करणारी जीप महाबळेश्वरकडुन वाईकडे निघालेल्या एका एसटी बसला ओव्हरटेक करताना जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातून पल्टी झाली. या अपघातात जीपच्या चालकासह आठ शाळकरी विद्यार्थी जखमी झाले. या सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आठ पैकी तीन विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी वाई येथील मिशन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संतप्त पालकांनी येथील आगार प्रमुखांना घेराव घातल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
महाबळेश्वर पासून आठ किमी अंतरावर अवकाळी गावाच्या हद्दीतील रस्ता हा अपघात प्रवण झाला आहे. गेल्या तीन महीन्यांमध्ये येथे विविध वाहनांचे अनेक अपघात झाले. या अपघातांची मालिका सुरूच असून या मालिकेमध्ये आजच्या वडाप जीपच्या अपघातीची भर पडली आहे. दररोज महाबळेश्वर येथून शाळकरी विद्यार्थ्यांना पांचगणी येथे शाळेला घेवुन जाते व शाळा सुटल्या नंतर त्या सर्व मुलांना पुन्हा महाबळेश्वर येथे आणून सोडते. आज पांचगणी येूुन आठ विद्यार्थ्यांना घेवून वडापची जीप ही महाबळेश्वर कडे येत होती. जीप अवकाळी गावाच्या हद्दीत आली तेव्हा महाबळेश्वरकडून वाईकडे जाणारी एक बस समोरून आली त्या एस टी बसला जागा देवुन पुढे जात असताना ही जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात गेली. त्यामुळे जीप पूर्ण पलटी होवुन अपघात झाला. या जीपमधील चालक गणपत वागळे यांचेसह साक्षी प्रशांत मोरे (वय 15), सेजल निलेश धनावडे (वय 14), वेदांत दिलीप सुर्वे (वय 15), सुमित रविंद्र मोरे (वय 16), यश हनुमंत धनावडे (वय 12), साक्षी हनुमंत धनावडे (वय 14), साक्षी विजय जाधव (वय 16), यश रविंद्र मोरे (वय 15) हे जखमी झाले. या सर्व जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. एस. व्ही. जगताप यांनी तातडीने उपचार सुरू केले अपघाताची खबर शहरात पसरताच विद्यार्थ्यांचे पालकांनी येथील ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. जखमीपैकी सुमित मोरे, सेजल धानावडे व साक्षी मोरे यांना पुढील उपचारासाठी वाई येथील मिशन रूग्णालयात पाठविण्यात आले.
या जीपच्या अपघातास समोरून आलेली एस. टी. बस कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू झाल्याने संतप्त पालकांनी येथील बस स्थानकावर एकच गर्दी केली होती युवासेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी विजय नायडु, शंकर ढेबे, सचिन वागदरे यांनी या संदर्भात एस. टी. आगार प्रमुख रमाकांत शिंदे यांना घेराव घातला व प्रश्नांचा भडीमार केला. सर्व पालकांनी संबंधित बस चालकावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान बस स्थानकावर तणावपूर्ण वातावरण पसरू लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले खबर मिळताच वाहतुक विभागाचे सहा पोलिस निरिक्षक प्रज्ञा देशमुख हे कुमक घेवुन तात्काळ बस स्थानकावर पोहचले व त्यांनी हस्तक्षेप केला. दरम्यान, या अपघाताची नोंद पांचगणी पोलिस ठाण्यात करण्यात आली.