कराड : जखिणवाडी, (ता.कराड) येथे रानात बांधलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला ठार मारल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास घडली. बिबट्याचा जखिणवाडी परिसरात वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जखिणवाडी येथील आगाशिव डोंगराच्या पायथ्यालगत सुखदेव बिरू येडगे यांची शेतजमीन आहे. या शेतात आबा दशरथ येडगे यांनी मेंढराचा कळप बसवला होता. तसेच मेंढराच्या कळपालगतच त्यांचा घोडा होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी कळपालगतच असलेल्या एका झाडाला घोडा बांधला होता. मध्यरात्री 1 च्या सुमारास कळपाच्या दिशेने बिबट्याने माग काढत झाडाला बांधलेल्या घोड्याजवळ आला. यावेळी बिबट्याने या घोड्यावर हल्ला चढवत जबड्याने घोड्याच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला.
बिबट्याने घोड्याच्या मानेचा व पोटाच्या भागाचा फडशा पाडला आहे. सकाळी बिबट्याच्या हल्ल्याची बातमी जखिणवाडी गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून पाहणी केली. तसेच सकाळी 7 च्या सुमारास वनविभागाचे वनपाल एस.ए.जाधव व डी. बी. बर्गे यंानी घटनास्थळाला भेट देवून मृत्यूमुखी पडलेल्या घोड्याचा पंचनामा केला बिबट्याचा या परिसरात मुक्त वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. या परिसरात वन विभागाने सापळा रचून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे