सातार : ब्रिटीश कालीन ,निकृष्ट दर्जाचे सातारा जिल्ह्यातील कालबाह्य झालेले व वाहतुकीस अयोग्य असलेले पुल तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी आज रिपाई शाखा सातारा जिल्हा यांच्यावतीने क्षेत्रमाहुली येथील पुलावर रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान या आंदोलन प्रकरणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.
महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सातारा जिल्हा रिपाईच्यावतीने सातारा जिल्ह्यातील ब्रिटीश कालीन व निकृष्ट दर्जाच्या पुलाचा सर्व्हे करून कालबाह्य झालेल्या पुलांची दुरूस्ती किंवा पुलावरील वाहतुक बंद करून दुर्घटना टळावी म्हणून जिल्हाधिकारी आश्विन मुद्गल यांना दि. 7 ऑगस्ट 2016 रोजी निवेदन दिले होते. मात्र या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी दुपारी 12 वा. क्षेत्रमाहुली येथील पुलावर रिपाईच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलन प्रकरणी व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सातारा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तुपे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शुक्राचार्य भिसे, सदाभाऊ पल्लाळ, फारूख पटणी, वैभव गायकवाड, सचिन वायदंडे, साईनाथ खंडागळे, मधुकर आठवले, अमोल कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले व सायंकाळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.