वडूज : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथील बाजार पटांगण मैदानात माजी केंद्रीय मंत्री शरदराव पवार यांची जंगी सभा झाली. सभेच्या व्यासपीठावर तिन तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख पदाधिकारी तसेच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह निवडक पदाधिकार्यांची चांगलीच गर्दी झाली होती. दहिवडी येथील सभेनंतर फलटण येथे सभा होणार असल्याने काही मान्यवरांनी निम्यातच व्यासपीठ सोडले. त्यांच्या जाण्यानंतर रिकाम्या झालेल्या खुर्चीवर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांना आळी-पाळीने बसविण्यात आले. त्यांची पवार साहेबांशी जवळून ओळख करुन देण्यात आली. या पदाधिकार्यांना पवार साहेबांनी नेमका काय कानमंत्र दिला. याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांसह उपस्थित राजकीय जाणकारांना निर्माण होणे साहजिक आहे.
दहिवडीची सभा निम्मी झाल्यानंतर फलटणला जाण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उमेदवार शिंदे मामांनी पहिल्यांदा व्यासपीठ सोडले. ते गेल्यानंतर सुरुवातीला गोंदवले येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब माने यांना साहेबांच्या शेजारील खुर्चीवर बसविण्यात आले. स्थानिक पदाधिकार्यांनी श्री. माने हे माणचे पूर्वाश्रमीचे जेष्ठ नेते यशवंतराव उर्फ बुवासाहेब माने यांचे सुपुत्र असल्याची ओळख करुन दिली. त्यावेळी पवार साहेबांनी स्मितहास्य करुन त्यांचे स्वागत केले. पवार साहेबांशी जवळून ओळख झाल्याने धन्य झालेल्या बाळासाहेबांना दोन मिनिटांनी तिथून बाजूला बसण्याचा इशारा झाला. त्यानंतर माणचे अध्यक्ष एम. के. भोसले, खटावचे अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांना आळी-पाळीने पवार साहेबांच्या जवळ जाण्याची संधी देण्यात आली. एका बाजूला राष्ट्रवादीच्या नेत्यांशी काँग्रेस कार्यकत्यांची सलगी सुरु असतानाच दुसर्या बाजूला पृथ्वीराज बाबांचे स्विय सहाय्यक श्री. आवळकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्या शशिकलाताई देशमुख यांनीही बाबांशी जवळून ओळख करुन घेतली. तर मायणीचे जि. प. सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांनी आपल्या सुपुत्रास बाबांच्या शेजारील खुर्चीत बसवत आपले युवराज ऋत्वीक गुदगे हे राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर असल्याचे कार्यकत्यांना दाखवून दिले.
ओळख परेडचा हा सिलसिला अगदी शेवटपर्यंत सुरु होता. सभा संपल्यानंतर पवार साहेब व्यासपीठावरुन खाली निघाले असतानाच माण काँग्रेसचे जेष्ठ नेते विष्णू बाळा अवघडे स्वत:च मी विष्णू बाळा असे सांगत ओळख परेडसाठी समोर आले. त्यांच्याकडे पाहात पवार साहेब स्वत:च्या स्टाईलमध्ये मिस्कीलपणे हासले.
ही सर्व ओळख परेड सुरु असतानाच एरवी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेवून पक्षवाढीसाठी अहोरात्र झटणार्या पण मान्यवरांच्या भाषणात नामोल्लेख नसणार्या पदाधिकार्यांचे चेहरे कॅमेर्यात टिपण्यासारखे झाले होते.
संगित खुर्ची, ओळख परेड अनं कानमंत्र
RELATED ARTICLES