शिवसेना कार्यकर्ते संतप्त * आगार अधीक्षकाच्या फलकाला फासले काळे
सातारा : एसटी महामंडळाच्या चालक वाहक व्हॉटस्अप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने अज्ञात 15 ते 20 जणांनी सातारा आगाराचे मुख्य अधीक्षक नौशाद अब्दुल रहिमान तांबोळी यांच्या केबीनची तोडफोड केल्याने बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा येथील मुख्य बसस्थानकातील चालक-वाहक यांचा व्हॉटस्अपवर एमएसआरटीसी अशा नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर बसस्थानक प्रमुख नौशाद तांबोळी आहेत. त्यांनी काल एमएसआरटीसी ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यात ग्रुपमधील काही सदस्यांनी आक्रमक भुमिका घेत आमच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. आज सकाळी या ग्रुपवरील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने अज्ञात 15 ते 20 जणांच्या टोळक्याने बसस्थानकात घुसून तांबोळी यांच्या केबीनमध्ये जाऊन तोडफोड करण्यात सुरूवात केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती पोलीसांना समजलेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी झाले. तोपर्यंत ते टोळके तेथून पसार झाले होते. संबंधित घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत दाखल झाली नव्हती.
शिवसेनेचे सातारा शहरचे नेते किशोर पंडीत यांना या आक्षेपार्ह पोस्टबद्दल माहिती मिळाली असताना त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सातारा बसस्थानकात जाऊन तांबोळी यांना काळे फासण्यासाठी गेले असता, तांबोळी केबीनमध्ये नसल्यामुळे त्यांनी केबीनमधील खुर्चीला काळे फासण्याचा प्रयत्न केला. व आगाराच्या आवारातील फलकावर असणार्या तांबोळी यांच्या नावाला त्यांनी काळे फासले. मात्र पोलिसांनी तात्काळ पंडीतांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या आक्षेपार्ह पोस्टची सातार्यात दिवसभर चर्चा होती. तोडफोडीनंतर आगारात सन्नाटा पसरला.