Sunday, May 18, 2025
Homeठळक घडामोडीमहादेव जानकरांच्या स्वागताला सातार्‍यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी

महादेव जानकरांच्या स्वागताला सातार्‍यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी

सातारा : आयुष्यभर महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी घरदार सोडणारा तरुण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख तयार करतो. ही ओळख तयार करणारा हा तरुण म्हणजे मंत्रिमंडळात नुकताच समावेश झालेले कॅबिनेट दर्जाचे पशुधन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शनिवारी डीपीसीच्या निमित्ताने प्रथमच सातार्‍यात आगमन झाले. या भूमीपुत्राच्या स्वागतासाठी शासकीय विश्रामगृह अक्षरश: गर्दीने ओसंडले. माण तालुक्यातून तसेच विविध संघटनांचे मिळून जवळपास दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते विश्रामगृहाच्या आवारात जमल्याने शहर पोलिस यंत्रणेवर चांगलाच ताण पडला. कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम पाहून जानकरांनी शेवटी विश्रामगृहाचा सोफा सोडून परिसरातल्या बागेतील हिरवळीवर बैठक मारली व जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनाही बसायला भाग पाडले. खुल्या वातावरणात जानकरांनी बैठक जमवत जिल्ह्याच्या विविध प्रश्‍नांवर एक तास चर्चा केली.
महादेव जानकर हे मूळचे माण तालुक्यातले पळसावडे गावचे. शाहु-फुले, आंबेडकर या विचारधारेत तयार झालेला लढवय्या कार्यकर्त्याने गेल्या 25 वर्षात सातत्याने संघर्ष करुन पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करताना आपला एक वेगळा दबदबा तयार केला. या वलयाची दखल घेत सातार्‍याच्या या भूमिपूत्राचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून केला. शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महादेव जानकर प्रथमच सातार्‍यात आले. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पाऊल ठेवताच कार्यकर्त्यांचा जोश अक्षरश: ऊतू गेला. एरवी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या मुक्कामी दौर्‍यातच किंवा काँग्रेसचे मंत्री पतंगराव यांच्या धावत्या भेटीत शासकीय विश्रामगृह हे कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरुन जाते. मात्र आजचे निमित्त वेगळेच होते. सातारच्या मातीशी संघर्षाची नाळ सांगणारे महादेव जानकर यांनी राजकारणात जी उंची गाठली त्या उंचीचे कौतुक करण्यासाठी माण तालुक्यातला तळागाळातला कार्यकर्ता आवर्जुन विश्रामगृहात पोहोचला होता. ज्या नियोजन भवनाने महादेव जानकरांमधला थेट जाब विचारणारा कार्यकर्ता पाहिला. त्याच जानकरांमधील नियोजन समितीच्या बैठकीतील प्रशासकीय कौशल्यही अनुभवले. विश्रामगृहात कार्यकर्त्यांची गर्दी शिगेला पोहोचल्याने सातारा शहर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना गर्दीला आवरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व विश्रामगृहासाठी जादा कुमक मागवावी लागली. विश्रामगृहाच्या दालनामध्ये हार-तुर्‍यांचा तर खच पडला. मात्र तरीही कार्यकर्त्यांना जानकरांच्या दर्शनाची आस होती. हा आग्रह पाहून जानकरांनी पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या समवेत विश्रामगृहाच्या बाहेरील लॉनवरच बैठक मारली आणि खुल्या वातावरणात गप्पांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विविध प्रश्‍नांची सखोल चर्चा केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular