चौदा विद्या व 64 कला यांची देवता म्हणजे गणपती. गणपती म्हणजे बुध्दीची देवता या देवतेच्या आगत स्वागतासाठी पुन्हा एकदा सातारकरांच्या घामाचे पन्नास लाख रूपये मातीत घालण्याची दुर्बुध्दी सातारा नगरपालिकेला झाली आहे. बुध्दी वाटण्याच्या मोहिमेवर जेव्हा रिध्दी सिध्दी होत्या तेव्हा सातारा नगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा उद्योग करणार्या मंडळींनी यंदाच्या गणेशोत्सवात मुर्ती विसर्जनासाठी पुन्हा कृत्रिम तलावाचा पर्याय ठेेवल्याने दरवर्षी चव्हाटयावर येणारा सातारकरांच्या पैशाचा अपव्यय कसा टाळायचा? मनोमिलनाचे नेते जी दिशा सांगतात ती घोडयाला गाढव म्हणून सातार्यात लगेच निश्चित होते. नेते म्हणाले (अर्थात खा.उदयनराजे भोसले)? नेते म्हणाले, मंगळवार तळे विसर्जनासाठी खुले तेव्हा सातार्यातील गणेश भक्तांना आनंदाची भरती येते. आणि ऐतिहासिक अशा मंगळवार तळयाची प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विसर्जनाने अक्षरशः वाट लागते. त्यामुळे पालिकेच्या गरजू नगरसेवकांना रोजगार उपलब्ध होतो. हातावरची पोटं त्यांची. त्यांच्या पोटाची सोय कोणी करायची? मग गणेश विसर्जनानंतर सवडीने तीन महिन्याने वीस ते पंचवीस लाख रूपयांचा तळे स्वच्छतेचा अजेंडा राबवला जातो. सातार्यात तळयांचे राजकारण भलतेच पॉवरफुल आणि तळयांचे राखणदारही तितकेच वजनदार. तळे राखील तो पाणी चाखेल ही म्हण सातार्यातील दोन्ही आघाडयांच्या पक्षप्रतोदांनी अक्षरशः सार्थ ठरवली आहे. सातारा विकास आघाडीचे राजकारण गोडोली तलावाच्या काठावरून चालते. आणि नगरविकास आघाडीचे गेम प्लान हे मंगळवार तळयाचया काठावर शिजतात. आता अर्थात जो सुज्ञ सातारकर आहे त्यांच्या एव्हाना हे लक्षात आले असेलच. तळे स्वच्छतेच्या मोहिमेत तळयाबरोबर पालिकेची तिजोरीही व्यवस्थित साफ कशी करायची आणि माफक खर्चाची कागदे कशी रंगवायची अर्थातच हा अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयाने रंगलेला हा राजीखुशीचा मामला आहे.तिथे आपल्या सारख्या बापूडवान्या सातारकराने काय बोलायचे? तर सांगायचा मुद्दा हा ज्या तळयासाठी गतवर्षी पालिकेला 50 लाख रूपये मोजावे लागले त्याच 50 लाखाचा भुर्दंड पुन्हा यावर्षी देण्याची सुरू झाली आहे.
येत्या 5 सप्टेंबरला गणरायाचे आगमन सातार्यात होत असून यंदाही भक्ती शक्तीचा हा उत्सव श्रध्देने साजरा होणार त्यात पाऊसही सरासरीपेक्षा जास्त झाल्याने यंदा दुष्काळाची झळ तशी कमीच आहे. त्यात स्कायमेटने पुढच्या दोन महिन्यात पुन्हा 78 टक्के पावसाचा अंदाज वर्तविल्याने सारे काही हिरवेगार त्यामुळे मंदी नंतर पुन्हा तेजी असे सुचक्र गती पकडू लागले आहे. मग गणपतीच्या आगमनासाठी सातार्यात पर्यावरण पुरक गणेशोत्सवाचा एक मोठा प्रयत्न केला जातो. या गणेशोत्सवासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती सारख्या संघटना सातार्यात घरटी प्रचार करून प्रामाणिकपणे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा पुरस्कार करतात. ज्या सातार्यात इको फ्रेंडली गणपतीचा एक दबदबा आहे त्या सातार्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्याचे पाच कोटीचे अर्थकारण इथल्या मातीत मुरले आहे. काही गणपती थेट पेणवरून येतात. हे सर्व ठीक असले तरी प्रश्न येतो तो विसर्जन प्रक्रियेसाठी लागणार्या जलकुंडांचा. शहरातल्या मोठया मुर्त्यासाठी विसर्जन तलावांची आवश्यकता पडते. पुन्हा एकदा राजवाडयाचा भवानी तलाव पाणी भरून तयार केला जाईल. आणि वर्षभर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मातीने या तलावाची रया घालविण्याचे उद्योग नगरपालिका इमाने इतबारे करील या भवानी तलावाचे जलतरण तलावात रूपांतरण करण्यात आले. आणि येथील यंत्रणा गंजत ठेवण्यात प्रशासनाने धन्यता मानली. पर्यावरण पुरक गणेशोत्सव ही जबाबदारी निर्माण करण्याचा फार्स केवळ बैठकांमधूनच केला जातो. आणि या बैठका गणपती अगदी चार दिवसाच्या तोंडावर आले असता घेतल्या जातात. यामध्ये सुचनांचा भडीमार होतो प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य असते. गतवर्षी मंगळवार तळयात विसर्जनाला सुप्रीम कोर्टानेच बंदी घातल्याने कृत्रिम तलावासाठी पालिकेला बरीच धावाधाव करावी लागली. तरतूद नसताना जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने 50 लाखाची जुळणी करून तलाव उभारण्यात आला आणि नंतर तो दोन महिन्यांनी नष्ट करण्यात आला. तोपर्यंत त्यामध्ये तीन कुत्री बुडून मेली. हा धोका परत वेगळाच. दगडी कुंडाच्या पुनरूज्जीवनाचा किंेवा तात्पुरत्या हौदाचा पर्याय विचारात घेतला जात नाही शेवटी नगरसेवकंाचा रोजगार महत्वाचा हे इथले अर्थकारण आहे.
सातारकरांचे 50 लाख गणपतीसाठी पुन्हा पाण्यात
RELATED ARTICLES