Friday, March 28, 2025
Homeवाचनीयअग्रलेखकाळविटाला अखेर कोणी मारले?

काळविटाला अखेर कोणी मारले?

2015 चे सालामध्ये तमाम भारतीयांना एकाच प्रश्‍नाने अस्वस्थ केले होते. कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा? ए राजा मौली दिग्दर्शित बाहुबली या चित्रपटातील हा डायलॉग प्रचंड प्रसिध्द झाला. या प्रश्‍नाचे उत्तर येत्या डिसेंबर महिन्याच्या उत्ततराधार्थ बाहुबली भाग 2 या पुढच्या सिक्वेलमध्ये मिळणार आहे. असाच काहीसा प्रकार सुलतान, दबंगफेम अभिनेता सलमान खानच्या शिकार प्रकरणाबाबत घडला आहे. राजस्थानच्या उच्च न्यायालयाने सलमान खानची 1998 साली घडलेल्या जोधपूर जिल्हयातील काळवीट शिकार प्रकरणातून सलमान खानची निर्दोष मुक्तता केली. या घटनांमुळे सोशल मिडीयाच काय तर अगदी सामान्य माणूसही संभ्रमित आहे. त्यामुळे सलमानची ऑनस्क्रीन भाभी असणार्‍या रेणुका शहाणे यांनीसुध्दा अखेर काळवीटाला कोणी मारले? असे ट्विट करून सलमानच्या करणीवर सडकून टिका केली. बॉलिवूड अभिनेत्यासाठी कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरणारे बरेचसे उपद्रवी किडे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत. ही समाजव्यवस्था सरकारी यंत्रणेचाच एक भाग आहे. भारतात पैसा देवून कायदा हवा तसा वाकवता येवू शकतो. हा समज प्राधान्याने रूढ असून सेलिब्रिटींना एक न्याय व सर्वसामान्यांना एक न्याय अशी अपराधीपणाची भावना सुध्दा सर्वसामान्यांमध्ये खदखदत आहे. जोधपूरच्या धुुंदारीगड भागात सलमानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेता सैफअली खान, निलम, महेश ठाकूर यांच्यासह तीन काळवीटांची शिकार केल्याचे माहिती समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात सलमानची री ओढणारे भाट समर्थक लगेच अरे तुरेच्या भाषेत कायद्याला धमकावू लागले. कनिष्ठ न्यायालयाने मुंबईत सलमानला दोन वेगवेगळया प्रकरणात सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती. तेव्हा बॉलिवूडच्या बाजारात सलमानवर 150 कोटीची गंुंतवणूक झाली होती. त्यामुळे आपसुकच कायदा व कायद्याचे रक्षक यांनी सलमानच्या स्टारडम पणापुढे कर्तव्याच्या नांग्या टाकल्या त्यामुळेच सलमानची सुटका सोपी झाली. ज्या न्यायाधीशांनी सलमानला कठोर शिक्षा सुनावली तो न्यायाधीश हा मुळचा सातार्‍याचा होता. हा सातारी झटका सलमानला न मानवल्याने त्याने राजस्थानच्या उच्च न्यायालयात अपील केले. अर्थात येथेही सलमानने मजबूत अर्थकारण पडद्याआडून केल्याने शिकार प्रकरणाच्या मुळ पुराव्याच्या चिंध्या करून प्रत्यक्षात वेगळेच चित्र रंगवले गेल्याने न्यायालयासमोर काहीच स्पष्टपणे येवू शकले नाही. आजमितीला साडेबाराशे कोटी अशी मालमत्ता सलमान बाळगून आहे असे खाजगीत बोलले जाते. त्यामुळेच पैशाचा माज अंगातली मुजोरी ही बिइंग हयुमन असे म्हणून सलमानचे उदात्तीकरण केले जाते. मात्र प्रत्यक्षात सलमानचा तिरसट व हेकटपणा कधीतरी उसळतोच तो कसा? हे ऐश्‍वर्या रायला विचारा. काळवीट शिकार प्रकरणात सलमानची बर्‍याच बॉलिवूड मंडळींनी बाजू उचलली. ज्यावेळी न्यायाधीश डी.डब्ल्यू.देशपांडे यांनी सलमानला शिक्षा सुनावली तेव्हा या न्यायव्यवस्थेवर फिदीफिदी फुकट चर्चा करणारे हिंग्लिंश आंत्रप्रेन्युअर या प्रकरणात धावून आले. मुळात प्रश्‍न येतो काळवीटाची शिकार झाली निश्‍चित मग ती जर सलमानने केली नाही मग काळवीटाने काय आत्महत्या केली? अशा उपरोधिक प्रहसनांनी सोशल मिडीया गाजतो आहे. पोलीस यंत्रणेने केेलेल्या तपासात अनेक कच्च्या राहिलेल्या दुव्यांमुळे सलमानला फायदा कसा होईल याची काळजी घेण्यात आली. ज्या बंदुकांतून फायर झाले त्याचे छर्रे बंदुकीशी जुळणारे नव्हते. असा पंचनामा तयार झाला. तसेच जी गन वापरली गेली ती पक्षांना मारण्यासाठी होती. त्या एअर गनने काळवीटाची शिकार होवू शकत नाही. या सगळया प्रकरणात सलमान खानच टार्गेट झाला. सैफअली खान, निलम यासारखी मंडळी कुठेच प्रकाशात आली नाहीत. किंवा त्यांना येवू दिले गेले नाही. हॉटेल ताजमध्ये बसून सलमान डिक्टेशन देणार आणि त्या मुद्यांवर वकीलांंकडून प्रत्यक्ष घटनेच्या चिंध्या केल्या जाणार हे कायदा आंधळा असल्यामूळे होणारच होते यासाठी मुुंबईतील नामवंत वकीलांनी सलमानकडून गच्चम फी उकळली. ती इतकी की आता वकीलीला रामराम ठोकावा. मुंबईतील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातही मुंबई उच्च न्यायालयाने सलमानला क्लिनचिट दिली. मग लॅण्ड क्रुझर गाडीखाली चिरडल्या गेलेल्या सर्वच मयतंानी ठरवूनच त्याच् गाडीखाली आत्महत्या केली असे मानावे लागेल. ज्या पस्थितीत या सर्व गोष्टी घडत आहेत या सर्वच बाबी संशयास्पद आहेत. हायकोर्टात सलमानला अपील करण्यासाठी सायंकाळी 6 च्या नंतरही कोर्ट चालू ठेवून न्यायालयाच्या आदेशाची कॉपी देण्यात आली. मग ही यंत्रणा मॅनेज करणारी संधी साधू मंडळी कोण? त्यांचा सलमानला वाचवण्यात काय हशील.
अर्थातच सलमानचे हात दगडाखाली होते. अणि त्या दगडावर बसून  वन्यप्राणी काय किंवा सलमानच्या गाडीखाली चिरडल्या गेलेल्या दुर्देवी माणसांचे काय? साराच प्रकार हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आणि त्यामधे शासकीय यंत्रणाही सामील आहे. कायदयापुढे सर्व समान असतात. ही छापील वाक्य सर्वसामान्यांना लागू पडतात. मात्र सलमान, संजय दत्त यासारखे सुपरस्टार अशा कायद्यांना अपवाद असतो. संजय दत्तने जेलमध्ये टोप्या शिवून 957 रूपये कमावले. याची अगदी समाजसेवकाच्या थाटात बातमी होते. मात्र हा संजय दत्त दोन वर्षात सुमारे 8 महिन्याची टप्प्याटप्याने संचित रजा घेत म्हणजेच कायद्याचे मनाप्रमाणे  कसे लोणचे घालायचे हे बॉलिवूडमधल्या नामवंतांना चांगलेच ठावूक आहे त्यामुळेच काळवीट शिकार प्रकरणात जे बारा साक्षीदार तपासण्यात आले त्यातील 10 साक्षीदारांनी आपल्या साक्षी बदलल्याने त्यांना फितूर घोषित करण्याची वेळ आली. गाडीतले रक्ताचे डाग आणि घटनास्थळावरील काळवीटाचे रक्त हे एकमेकांशी जुळवण्यामध्ये सरकारी वकील यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे सलमान पुन्हा सुलतानगिरी करायला मोकळा झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular