सातारा हिल हाफ मॅरेथॉन : अभूतपूर्व प्रतिसादात
सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : ढगाळ वातावरण… यवतेश्वर घाटातील धबधबे …रस्त्यावर आलेले ढग … अशा आल्हाददायी वातावरणात आज सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धकांमुळे यवतेश्वर घाट फुलला होता. सातारकरांनी मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले. स्पर्धेवर इथिओपिया व केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले.
खुल्या गटात फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) या धावपटूने 1 तास 10 मिनिटं आणि 6 सेकंद इतकी सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. केनियाचा हिलारी किप्टू किमोसोप दुसरा तर भारतीय धावपटूंमध्ये धन्वत प्रल्हाद रामसिंग याने पहिला, भारतीय महिला गटात स्वाती गाडवे हिने पहिला क्रमांक पटकावला.
सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला पोलिस कवायत मैदानावरुन सकाळी 6.00 वाजता अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. शौर्यचक्र विजेते सुभेदार त्रिभूवन सिंग, खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले, श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, सातारा रनर्स फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.
नेटक्या संयोजनामुळे सातारा रनर्स फौंडेशनचे पदाधिकारी व सर्व टीम कौतुकास पात्र आहेत. गिनिज बुकमध्ये या स्पर्धेची नोंद झाली आहे. या पुढील काळात विविध विक्रम प्रस्थापित करत सातारा हिल मॅरेथॉन आपल्या साता-याचे नाव जागतिक स्तरावर उंचावेल अशा शब्दात श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
पोवई नाका, कर्मवीर पथ मार्गे शेटे चौक, कमानी हौद, राजपथावरुन राजवाडा- समर्थ मंदीरमार्गे बोगदा-प्रकृती रेसॉर्ट. परत बोगदा, अदालतवाडामार्गे शाहू चौक, रविवार पेठ पोलिस चौकी, कर्मवीर पथावरुन नाक्यावर धावपटू आल्यानंतर पोलिस मैदानावर स्पर्धेची सांगता झाली.
21 किलो मिटरच्या या स्पर्धेत हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी देशभरातूनच नव्हे तर काही आंतरराष्ट्रीय धावपटू शनिवारीच सातार्यात दाखल झाले होते. सकाळी 9.00 वाजता मफन रनफ सुरू झाली. ममै भी सिपाहीफ म्हणजे डॉक्टर, पोस्टमन, वकील, रिक्षाचालक आदी विविध व्यावसाईकांचा सन्मान करणारी थीम यामध्ये राबविण्यात आली. यावेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत मोठ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. सुमारे 8 हजार 500 स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
शिस्तबद्धता, जल्लोषी वातावरण, उत्कृष्ट नियोजनामुळे सातारा हिल मॅरेथॉनने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. या मॅरेथॉनचे नियोजन, संयोजन आणि सातारकरांच्या आदरातिथ्याबाबत येथे आलेल्या धावपटूंतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. सोशल मिडियावरही याचे पडसाद उमटले. सोशल मिडियावर रविवारी दिवसभर या मॅरेथॉनची धूम राहिली.
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, सुभेदार त्रिभूवन सिंग, जिल्हा सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत, दिलीप दोशी, गणेश देशमुख, राम कदम, लेफ्टनंट कर्नल रणजित नलावडे, किसनवीर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव तसेच सातारा रनर्स फौंडेशनच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
पोलिस कवायत मैदानावर तत्काळ वैद्यकीय सेवा तैनात ठेवण्यात आली होती. जणू छोटा अतिदक्षता विभागच उभारण्यात आला होता. ह्रदयविकाराचा झटका आल्यास अशाप्रसंगी तात्काळ लागणारं इंजक्शनही वैद्यकीय कक्षात उपलब्ध होते. 12 डॉक्टरपैकी एक पूर्णवेळ कार्डिऑलॉजीस्ट, 2 अतिदक्षता विभाग तज्ज्ञ असा चोख वैद्यकीय बंदोबस्त होता.
स्पर्धे दरम्यान, महाराष्ट्रीय पारंपारीक वेषात अगदी नवारी साडी नेसून धावणारी महिला लक्ष वेधून घेत होती. यावर्षी काही महिन्यापूर्वी स्पर्धेचे संयोजकांपैकी डॉ. संदीप लेले आणि सातारचे पत्रकार व धावपटू पांडूरंग पवार यांच्या आठवणींनी अनेकांची मने हेलावली. स्पर्धेत धावताना घामाच्या धारातून काहीसा थंडावा मिळावा म्हणून माची पेठेत सार्वजनीक मंडळांनी या धावणार्या स्पर्धकांवर थंड पाण्याचे फवारे उडवून त्यांच्या उत्साहात भर घातली होती. काही स्पर्धकांनी डॉ. संदीप यांचे फोटो असलेले बॅनर पाठीवर लावून त्यांना अनोखी श्रध्दांजली वाहीली. यावर्षी सातारा शहरात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या पोवई नाका परिसरातील कामामुळे स्पर्धेचा मार्ग आजपर्यंतच्या स्पर्धेपेक्षा विविध भागातून जात असल्यामुळे स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी अक्षरश: फुटाफुटावर कार्यकर्ते व पोलीस उभे होते. शहरातील अनेक तरुण मंडळांनी तसेच गणेश मंडळांनी धावणार्या स्पर्धेकांचा उत्साह वाढवण्यासाठी गणपती बप्पा मोरया, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमुन टाकला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण ठिकाणी संयोजकांनीही अतिशय सुरेख व्यवस्था साकारली होती. यामध्ये फोटोसाठी विजेता सेल्फी पॉइंट, घंटा नाद तसेच मनोरंजनासाठी हलगी तुतारीचा जयघोष आणि समुह नृत्ये विशेष आकर्षन ठरत होती.
धावताना अनेक धावपटूना शारिरीक त्रास झाला असता स्वयंमसेवक तातडीने व्हीलचेअरवरुन त्यांना नेत होते. पोलीस कवायत मैदानावरच आरोग्य सेवेच्या दालनात स्पर्धेनंतर अनेकांनी स्वत:चे बॉडी चेकप, तसेच मसाज सुविधेचा लाभ घेतला. दरवर्षी होणार्या या स्पर्धेचे विजेतेपद गेली अनेक वर्षे इथिओपीया, केनीया देशाचे स्पर्धक घेत असल्याने त्यांचे वर्चस्व या स्पर्धेवर सिध्द झाल्याचे दिसून येत होते.
धावपटू साता-याच्या प्रेमात !
नागमोडी वळणं घेत जाणारा घाटमार्ग, छोटे धबधबे, चोहीकडे दाटलेली श्रावणातील हिरवळ, शुद्ध हवा, सातारकरांचे आदरातिथ्य या सर्वांच्यामागे खंबीरपणे उभा असलेला स्थितप्रज्ञ अजिंक्यतारा अशा निसर्गरम्य वातावरणाच्या मोहात धावपटू पडले नाही तरच नवल! याची अनुभूती या मॅरेथॉनच्या निमित्ताने आली.
आज मुंबई व हैद्राबाद येथेही मॅरेथॉन होत आहेत. तरीही बहुतांश धावपटूंनी साता-याला पसंती दर्शवली. सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार धावपटूंचा स्पर्धेत सहभाग असला तरी तब्बल 6 हजार 500 धावपटू देशविदेशातून साता-यात आले होते. पुढील वर्षीही जरुर येणार असा निर्धार करुनच या पाहुण्यांनी साता-याचा निरोप घेतला.
बाईक अॅम्ब्युलन्स
धावपटूंच्या वैद्यकीय सोईसाठी 13 रुग्णवाहिका, त्यातील 7 मिनी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. घाटात तसेच अरुंद रस्त्यावर वेळप्रसंगी पोहचण्यासाठी 2 बाईक अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या होत्या. गरजेनुसार रुग्णाला जागेवर कृत्रिम श्वासोश्वास देण्याची सोय या मबाईक अॅम्ब्युलन्सफमुळे शक्य होते.
अंध बांधवांचे फूट मसाज
मॅरेथॉन झाल्यानंतर धावपटूंसाठी फूट मसाजची व्यवस्था करण्यात आली होती. पायांची मसाज करणा-या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईच्या कांचन काया या स्वयंसेवी संस्थेतील 6 अंधबांधवांचा समावेश होता. त्यांच्याकडील कौशल्य पाहून धावपटूंसह सातारकरही आवाक झाले. सातारा रनर्स फौंडेशनच्या सहकार्यामुळे अंधबांधवांनी ही सेवा दिली होती.
मॅरेथॉन दरम्यान अनेक स्पर्धकांना त्रास झाला काही चककर येवून पडले काहींनी पायांना मॉलिश करुन घेतली काहींना अॅडमिट केले कोल्हापुरमधील पुरग्रस्तांनी सुद्धा सहभाग घेतला होता.
78 वयोगटात पवार यांना तिसरा नंबर पटकावला त्यांचे समवेत त्यांचा मुलगा शुभेच्छा देण्यासाठी हजर होता.
(खुला गट)
पहिला क्रमांक
फिक्रू अबेरा दादी (इथिओपिया) 1.10.06
1,50,000/-
दुसरा क्रमांक
हिलारी किप्टू किमोसोप (केनिया)
1.11.35
1,00,000/-
तिसरा क्रमांक
फ्रेसिव अस्फाव बेकल (इथिओपिया)
1.11.56
75,000/-
महिला गट
पहिला क्रमांक
मर्सी जेलीमो टू (केनिया) 1.24.30
1,50,000/-
दुसरा क्रमांक
जेनेट अॅडेक अग्टेव (इथिओपिया) 1.25.48
1,00,000/-
तिसरा क्रमांक
झिनेबा कासिम गेलेटो (इथिओपिया) 1.29.35
75,000/-
भारतीय
प्रथम क्रमांक
धन्वत प्रल्हाद रामसिंग
1.12.53
50,000/-
दुसरा क्रमांक
राहूल कुमार पाल
1.13.19
30,000/-
तिसरा क्रमांक
आदिनाथ भोसले
1.15.04
20,000/-
भारतीय महिला
पहिला क्रमांक
स्वाती गाडवे
1.25.18
50,000/-
दुसरा क्रमांक
रेश्मा केवटे
1.32.29
30,000/-
तिसरा क्रमांक
आरती देशमुख ( )
1.33.40
20,000/-