सातारा : सातारा पंचायत समिती मासिक सभेत गट शिक्षण अधिकारी धुमाळ यांनी झालेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनात 53 हजारांचा गफला केल्याचा गंभीर विरोधी गटाचे सदस्य रामदास साळुंखे, संजय पाटील यांनी केला. या आरोपामुळे सभागृहात सन्नाटा पसरला होता. सदस्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ यांना घाम फुटला होता. सभापती मिलिंद कदम म्हणाले, विज्ञान प्रदर्शनाचा खर्च सदस्य राहुल शिंदे यांच्या सहकार्याने केला आहे.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, सरिता इंदलकर, कांचन काळंगे, संजय पाटील, संजय घोरपडे, हणमंत गुरव, रामदास साळूंखे, वंसुधरा ढाणे, सुशिला जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खासदार गटाच्या सातारा विकास आघाडीच्या पंचायत समितीच्या सदस्यांनी विविध प्रश्नावर सत्ताधार्यांना कोंडीत पकडले होते. सातारा तालुक्यात शाळांचे पाटखळ येथे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते. या तालुका प्रदर्शनावरून विरोधी सदस्यांनी गटशिक्षण अधिकारी धुमाळ यांना धारेवर धरले होते. या प्रदर्शनाकरता 200 रुपये प्रवेश फी घेण्याचा लेखी आदेश आहे का?, झालेला खर्च कुठे केला?, कसा केला?, त्याचा हिशोब द्या, अशा प्रश्नांचा भडीमार करत त्यांना घामच फोडला. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी सुमारे 53 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सदस्य संजय पाटील, रामदास साळुंखे यांनी केला. त्यावर गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांनी हिशोब केलेला नाही, शुल्क घेण्याबाबतची नियमावली माध्यमिकचे शिक्षणाधिकारी क्षीरसागर यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगून पंचायत समितीच्या मासिक सभेत खळबळ उडवून दिली. दरम्यान, शालाबाह्य सर्व्हे नेमका कुठे होतो आहे, महिला सदस्या सरिता इंदरकर यांनी अधिकार्यांना फैलावर घेत करारीपणा दाखवून दिला.
सदस्य रामदास साळुंखे म्हणाले, तुम्ही विज्ञान प्रदर्शन घेतले ही बाब चांगली आहे. पण मला सांगा शाळांच्याकडून प्रवेश फी म्हणून दोनशे रुपये कसे घेतले?, त्याचा खर्च कुठे आणि कसा करण्यात आला याची माहिती सभागृहात द्यावी, अशी मागणी केली. त्यावर संजय पाटील यांनीही तुम्ही पैसे कोणत्या निकषानुसार घेतले त्याचा काय लेखी आदेश असेल तर सभागृहात सादर करावा, अशी मागणी करताच गटशिक्षणाधिकारी धुमाळ हे थोडावेळ एकाच जागी स्तब्ध राहिले अन् त्यांनी मांडव,स्मृतिचिन्ह याकरता खर्च झाला आहे. परंतु हिशोब केला नाही. 265 जणांनी सहभाग घेतला होता. प्रवेश फी घेण्याबाबत माध्यमिकच्या शिक्षणाधिकार्यांनीच सांगितले होते. त्यांच्याकडे लेखी आहे, असे सांगितले. त्यावर रामदास साळुंखे म्हणाले, मला खर्च देण्यात यावा, पुढच्यावेळीचे प्रदर्शन हे कोडोलीत घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर सभापती कदम म्हणाले, सर्व खर्च सदस्यांनी करावा, असे सांगताच रामदास साळुंखे म्हणाले, आम्ही खर्च करायला तयार आहोत. परंतु इथल्या खर्चाचे काय?, त्यावर कदम यांनी या प्रदर्शनाचा खर्च आणि सहकार्य राहुल शिंदे यांनी केल्याचे सभागृहात सांगितल्याने लगेच उपस्थितांना प्रश्न पडला तो म्हणजे गोळा केलेल्या वर्गणी रुपी 56 हजार रुपयांचे झाले काय? असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान आलेल्या सेस फंडावरुन सभेच्या शेवटी चर्चा झाली. विरोधी गटाच्या सदस्यांनी समान वाटप करण्यात यावी, अशी मागणी केली. तर एवढा तुटपुंजा फंड आम्हाला नको असा पवित्रा सुशिला जाधव यांनी घेतला. संजय पाटील यांनी मागच्यावेळेसारखा फंड देण्यात येवू नये. सर्वांना समान न्याय द्यावा, असे सांगितले. त्यावर मिलिंद कदम यांनी कोणावर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता जाधव यांच्यावरच थेट रामदास साळूंखे, संजय पाटील यांनी आरोप केला. तुमचे ठेकेदार लोकांच्याकडून पैसे गोळा करुन पाणी टंचाई करत आहेत. हा प्रकार थांबवा, यामध्ये अधिका़र्यांचाही समावेश आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.
सातारा गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळांकडून विज्ञान प्रदर्शनात गफला: विरोधी सदस्यांचा आरोप
RELATED ARTICLES