Friday, March 28, 2025
Homeठळक घडामोडीसातारा, पुण्याची कमान पृथ्वीराज चव्हाणांकडे

सातारा, पुण्याची कमान पृथ्वीराज चव्हाणांकडे

सातारा : मोदी वादळामध्ये भुईसपाट झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसने पुन्हा मोर्चेबांधणी सुरु केली असून महाराष्ट्रातील 191 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये धवल यश मिळवण्यासाठी 121 कार्यकर्त्यांची जम्बो कार्यकारिणी निश्‍चित केली आहे आणि या कार्यकारिणीची कमान कराड दक्षिणचे आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सातारा व पुणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाण यांना सोपवण्यात आले असून आगामी पालिका निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची रणनिती निश्‍चित करण्यात आली आहे. केंद्राच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून काम करताना चांगलाच ठसा उमटविला. आघाडी शासनाच्या काळात आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आल्याने काँग्रेसला मि. क्लिन म्हणवणार्‍या पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रातून महाराष्ट्रात पाठवावे लागले होते. तेव्हाही साडेतीन वर्षे चव्हाण यांनी काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसारच कारभार केला. लोकसभा निवडणुकांचे अपयश भलतेच जिव्हारी लागल्याने काँग्रेसने पुन्हा नव्याने संच बांधणी सुरु केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची विभागीय बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली. या बैठकीत पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्वाची सत्ता केंद्रे असणारी सातारा व पुणे जिल्हा याचा भार पृथ्वीराज चव्हाणांकडे सोपवण्यात आलेला आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखालीच दोन वर्षापूर्वी काँग्रेसने विधानसभा निवडणुक लढवली होती. मात्र त्यामध्ये काँग्रेसला दारुण अपयश आले. पुण्यातही अंतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसचा सुपडा साफ झाला तर राष्ट्रवादीला नेत्यांची अरेरावी नडली. सातारा जिल्ह्यातही माण व कराड दक्षिण तालुक्याचा अपवाद वगळता काँग्रेसला मरगळच आलेली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये काका, बाबा गटाचा नेहमीच वाद ऐरणीवर येतो. मात्र यंदाच्या पालिका निवडणुका भलत्याच गांभीर्याने घेण्यात आल्या असून पृथ्वीराज चव्हाण यांची त्यादृष्टीने रणनिती सुरु झाली आहे. येत्या आठवडा भरात कराड येथून सुरुवात करुन संपूर्ण सातारा जिल्ह्याचा दौरा होणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली. यामध्ये स्वच्छ प्रतिमचे तरुण उमेदवार उभे करुन त्यांना निवडून आणण्याची हमी पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या सातारा नगरपालिकेसह वाई, कराड, फलटण व महाबळेश्‍वर या पाच नगरपालिकांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular