म्हसवड : अमर रहे, अमर रहे, चंद्रकांत गलंडे अमर रहे जब तक सूरज चाँद रहेगा चंद्रकांत तुम्हाला नाम रहेगाच्या जय घोषात उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान चंद्रकांत शंकर गलंडे यांच्यावर जाशी, ता. माक्ष या त्यांच्या जन्मगावी शासककीय इतमामात बंदुकीच्या फेरी झाडून अत्यंत शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण माण तालुका गहिवरुन गेला होता. तर वीर पत्नीला शोक अनावर झाला. जाशीच्या अबालवृध्दांच्या डोळ्यातून वीर पुत्राला श्रध्दांजली अर्पण करताना अश्रूंचा महापूर वाहत होता.
काल रात्री विशेष सरकारी विमानाने शहीद चंद्रकांत गलंडे यांचे पार्थिव पुणे येथे आले होते. ते रात्री सातारा येथे ठेवण्यात आले होते. मंगळवार दि. 20 रोजी सकाळी शहीद चंद्रकांतचे पार्थिव माण तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर पिंगळी, गोंदवले, वाघमोडेवाडी, या गावातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन या वीर सुपुत्राला मानवंदना देण्यात आली तर पळशी येथील सर्व ग्रामस्थांनीही पार्थिवांचे अंतिम दर्शन घेतले.
त्यानंतर पार्थिव मूळ गावी जाशी येथे नेण्यात आल्यानंतर गावातील संपूर्ण नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती. वीर जवानाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण आसुलेला होता. गावातील लहान थोर, शालेय विद्यार्थी, स्त्रिया – पुरुष व यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, वीर जवान तुझे सलाम, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तर सकाळीच गावातील स्त्रियांनी प्रत्येक घरासमोर, रस्त्यावर रांगोळी काढली होती. गावातील लोकांनी दर्शन घेतल्यानंतर शहीद चंद्रकांत यांच्या गलंडे वस्तीवर पार्थिक नेण्यात आले. यावेळी त्यांच्या आई-वडिलांसह पत्नीचा आपल्या दोन चिमुरड्यासह केलेला आक्रोश व फोडलेला टाहो उपस्थितांचे हृदव हेलकावून टाकणारा होता.
यानंतर गलंडे कुटुंबियांच्या घराशेजारीच असलेल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते त्याठिकाणी पार्थिव नेण्यात आले. त्याठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयबापू शिवतारे, पशुसंवर्धन दुग्द विकास मंत्री ना. महादेव जानकर, अन्न पुरवठा मंत्री ना. गिरीष बापट, आ. जयकुमार गोरे, शेखरभाऊ गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सुरेखा माने, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी जाधव यांच्यासह शहीद जवान चंद्रकांत यांचे आई, वडिल, पत्नी, दोन चिमुरडी मुले, भाऊ यांनी श्रध्दांजली वाहिली. यानंतर लष्कराच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून पार्थिवास मानवंदना देण्यात आली व त्यानंतर बंधू गंजाप्पा गलंडे यांनी शहीद चंद्रकांतच्या पार्थिवास भडाग्नी दिला.
उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियाना शासकीय सेवेत नोकरीसह, 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगटीवार यांनी केली आहे.