म्हसवड : म्हसवड नजीक रांजणी गावाजवळ असणार्या ढवळे वस्तीवरील लहान मुलांनी किशोरवयीन मुलींसाठी वाटप करण्यात आलेली कच्ची सुकडी खाल्याने विषबाधा झाली असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील रांजणी येथील ढवळे वस्तीवरील बिरु नागु ढवळे हे मेंढपाळ कुटूंब राहत असून त्यांना पाच लहान मुले आहेत. ही मुले बुधवारी दुपारी शाळेतून दुपारी घरी आल्यानंतर शेजारी कुणीतरी किशोरवयीन मुलींसाठी वाटप करण्यात सुकडी आहार या मुलांना खाण्यासाठी दिला होता.परंतु किशोरवयीन मुलींचा आहार कच्चा न खाता शिजवणे बंदनकारक आहे.व तो आहार अकरा वर्षे पेक्षा जादा वय असलेल्या मुलींना देणें बंदनकारक आहे. मात्र याची पुसटशी कल्पना नसल्यामुळे दहा ते चार वर्षाप्रयन्तच्या मुलांनी कच्ची सुकडी खाल्ली होती. त्यामुळे दुपारी चार वाजलेपासून, छकुली ढवळे, काजल ढवळे, सुनील, दुर्गा, सायल, ढवळे या सर्वांना उलट्या व जुलाबाचा प्रचंड त्रास जाणवू लागला व त्यामधील दोन मुले अत्यवस्थ झाली.त्यावेळी बुधवारी रात्री उशिरा म्हसवड येथील एका खाजगी दवाखण्यात मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
किशोरवयीन मुलींसाठी शासनाच्या अंगणवाडी प्रकल्पा मार्फत या सुकडी आहाराचे वाटप केले जाते.मात्र हा आहार खाण्याची पद्धत शासनाने सुकडीच्या पॅक वर नमूद केली आहे.मात्र ग्रामीण भागात हा सुकडी आहार जनावरांना चारण्या साठी वापरला जातो ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, या विषबाधा प्रकरणाची एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी चौकशी करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.