सातारा पाकिलेच्या राजकारणामध्ये आता रंग भरु लागले असून नगराध्यक्षपदासाठी खुल्या गटाचे महिला आरक्षण जाहिर झाल्याने महिला केंद्रीय राजकारणाच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. 20 प्रभागातून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून वॉर्डावॉर्डात किती कामे झाली आणि किती राहिली याचा ताळेबंद मांडला जावू लागला आहे.
मनोमिलनाच्या हालचालींकडे लक्ष
2001 ते 2016 या दीड दशकाचा आढावा घेतला असता सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी या दोन आघाड्या पहिल्या टप्प्यात आमने सामने ठाकल्या होत्या त्यात सातारा विकास आघाडी प्रचंड बहुमत घेवून सत्तेत आली होती तेव्हा थेट नगराध्यक्ष निवड म्हणून रंजना रावत यांना मान मिळाला होता. मात्र नंतरच्या टप्प्यात शहराच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले हे दोघे एकत्र आले आणि 10 वर्षाचा मनोमिलनाचा संसारही केला. 230 कोटी रुपयांच्या तगड्या योजना सातार्यात येवूनही केवळ आरंभशूरपणा करुन त्याची वासलात लावण्यात आल्याने शहरात पायाभूत सुविधांची आजूनही ओरड सुरु आहे. मात्र राज्यातला सत्ता बदल मनोमिलनाला कडवी टक्कर देवू शकतो. भाजपने सातारा शहरावर लक्ष केंद्रीत केले असून मनोमिलनाला खिंडीत गाठण्यासाठी राजकीय जोर बैठका सुरु झाल्या आहेत. याची झलक दोन दिवसापूर्वी शहरातील एका मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत पहावयास मिळाली. मनोमिलनाच्या विरोधात सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. काही चेहरे गळाला लागले तर काही वश झाले नाहीत. या तुलनेने मनोमिलनाची शहराची पकड मजबूत असली तरी नगरसेवकांविरुध्द प्रचंड नाराजी आहे आणि त्याचा फटका आ. शिवेंद्रराजे भोसले यांना आमदारकीच्या इलेक्शनच्यावेळी बसला आहे. शहराच्या पूर्व भागात सुमारे 23 टक्के मतदान आमदारांच्या विरोधात गेल्याने आमदारांना इतके दिवस हात दगडाखाली होते आता हातात दगड घेण्याची वेळ आली आहे असे सूचक वक्तव्य करावे लागले होते. त्यामुळेच मनोमिलनाचा यंदाच्या इलेक्शनचा स्टँड काय असणार यावर सारी पुढील गणिते अवलंबून असणार आहेत. उदयनराजे यांनी छुपी राजकीय खेळी आणि ऐनवेळी पत्ते ओपन करण्याचे हुकमी तंत्र याचा पक्का अभ्यास भाजपला शहरात करावा लागणार आहे. कारण हमखास निवडून येतील असे चेहरे भाजपकडे नाहीत त्यामुळे साम दाम दंड भेद या चार तंत्रातील भेदनितीतील प्रयोगच भाजपला तारु शकेल असा अंदाज आहे. कारण 20 प्रभागापैकी सुमारे 11 प्रभागात म्हणजे निम्म्या प्रभागात एका वॉर्डात खुले आरक्षण असल्याने तिथे भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा तगडा संघर्ष होणार त्यामुळे नाराज चेहर्यांना पुढे आणून त्यांनाच मनोमिलनाच्या विरोधात दंड थोपटायला भाग पाडणे ती खेळी भाजपला करावी लागणार आहे. मनोमिलन की समोरा समोर सरळ लढत हा मुद्दा दिवाळी नंतर अर्थातच नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात अदालतवाड्याच्या साक्षीने सोडवला जाईल असे संकेत मिळत आहेत. मात्र राजकीय मुरब्बीपणा मुरलेल्या दोन्ही नेत्यामध्ये सातार्याबाहेर अचानक बैठक होवून काही धडक निर्णय घेतले जातात याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे असेच धक्का तंत्र यंदा कसे घडणार यावर शहराचे राजकारण गती घेणार आहे.
युतीचा संसार होणार?
भाजपच्या व सेनेचा राज्यातला युतीचा संसार हा घटस्फोटाच्या मार्गावरुन माघारी परतला आहे तरीसुध्दा अजून कुरबुरी सुरुच आहेत. त्यामुळे सातारा शहरात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपच्या जोडीला सेनेची ताकद बेरजेचे राजकारण म्हणून मिळवणार का हाही खरा चर्चेचा मुद्दा आहे. कारण पक्षश्रेष्ठींकडून पक्षचिन्ह व शतप्रतिशत भाजप अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
नगराध्यक्षपद हे खुले महिला गटासाठी असल्याने अचानक कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांना टक्कर देवू शकेल असे तगडे नाव अद्याप भाजपच्या गोटात नाही म्हणून भाजपची मोठी कसरत होणार आहे. मनोमिलनातही बरीच नावे पुढे येत असताना सर्व समावेशक नावावर शिक्कामोतर्ब होईल. ही राजकीय कसरत अवघडच वाटत आहे. त्यामुळे महिला केंद्री राजकारणाचे सुकानु सर्व पक्षांकडून कशा पध्दतीने हाताळले जाणार हा खरा औत्सुक्याचा मुद्दा ठरणार आहे.
चाचपणी…मोर्चेबांधणी…आणि राजकीय कसरती…
RELATED ARTICLES