सातारा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचया हद्दीत पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे नगरपालिकेने अनेक वर्षांपासून प्रवासी व प्रदूषण कर वसुलीकरिता निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये सर्वाधिक बोली लावणारे ठेकेदार यांना डावलून नगरपालिका प्रशासनाने सुमारे 5 लाख रुपयांचा फायदा झुगारुन दिला आहे. या वसुलीच्या ठेक्यामध्ये गफला झाल्यामुळे सदरचा ठेका रद्द करण्यासाठी नगरविकास व पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या हद्दीतील प्रवासी व पर्यावरण कर वसूल करण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधीत नगरपालिकेने 3 कोटी 79 लाख 50 हजार एवढ्या रुपयांची निविदा काढली होती. ही निविदा प्राप्त करण्यासाठी नागपूर येथील मेसर्स खळतकर कंस्ट्रक्शन, मुंबई येथील मोमीन इंटरप्रायजेस व सातार्यातील चंद्रकांत जाधव या तिघांनी ही निविदा ऑनलाईन भरुन हा ठेका मिळवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, सातारचे सुपुत्र चंद्रकांत जाधव यांचा निविदा कागदपत्राच्या कारणास्तव उघडण्यात आली नाही. तर इतर दोन ठेकेदारांच्या कागदपत्रांची पूर्तता झाली नसली तरी त्यांची निविदा उघड केली. असा गंभीर आरोप महाबळेश्वरकर करु लागले आहेत.
सदर दोन ठेकेदारांकडे प्रवासी कर वसुलीचा अनुभवाऐवजी पार्किंगचा अनुभव आहे. वॅट नोंदणी प्रमाणपत्र, टॅन प्रमाणपत्र , शासकीय अनुभव जोडला नाही तसेच निविदाच्या अर्जावर देय कर रक्कम अक्षरी सादर करण्याची होती परंतु ती त्यांना देण्यात आली नाही. याचीही कबुली देऊनही महाबळेश्वर नगरपालिकेने सातारचे चंद्रकांत जाधव यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. या निविदा प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप व आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होऊ लागल्याने खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे चंद्रकांत जाधव यांनी 3 कोटी 84 लाख 24 हजार रुपये ही सर्वाधिक बोली लावली होती. तर मे. खळतकर कं. 3 कोटी 41 लाख 7 हजार 562 रुपये व मोमीन इंटरप्रायजेसने 3 कोटी 79 लाख 65 हजार 180 रुपये अशी बोली नमूद केली होती. तरीही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेल्या चंद्रकांत जाधव या भूमिपुत्राला डावलून मुंबईतील मोमीन इंटरप्रायजेसला हा ठेका देण्यात आला. विशेष म्हणजे महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे वर्चस्व आहे. असे असताना एका मराठी उद्योजक शिवसैनिकाला करवसुलीच्या ठेक्यापासून परावृत्त करण्यात आले.
या गोष्टीमुळे शिवसैनिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चामुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली असतानाच छत्रपतींच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेत मराठा उद्योजकाला व भूमिपुत्राला डावलल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरमयान याबाबत महाबळेश्वर गिरीस्थान कार्यालयाशी संपर्क साधला असता संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.