(अजित जगताप )
तापोळा दि: दोन आठवड्याभरापासून मोसमी पावसाचे जोर असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचे उपाययोजना करण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनासाठी अशा ठिकाणी जाऊ नये. अशी सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडून पडले आहे.
याबाबत माहिती अशी की, पश्चिम घाटाच्या परिसरात मोसमी पाऊस कोसळत आहे. नदी- नाले- ओढे-बंधारे तलाव-छोटी धरणे एवढेच नव्हे तर रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत. साकव , पुलावरून माती मिश्रित पाणी वाहू लागलेले आहे
मोसमी वारे वेगाने वाहत असून काही झाडे व जुनेवाडे , कच्ची घरे कोसळून पडू लागलेले आहेत. त्यात जोडीला दाट धुके असल्यामुळे वातावरणामध्ये गारठा निर्माण झालेले आहे.सध्या पावसामुळे अनेक डोंगर माथ्यावरून धबधबे कोसळत आहेत. पर्यटनाची आवड असणारे अनेक जण या ठिकाणी भेट देण्यासाठी आवर्जून येत होते. महाराष्ट्रातील काही भागात नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नआल्यामुळे अनेक ठिकाणी बुडून मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.
काही धबधब्यावरून निष्काळजीपणाने पर्यटक कोसळून काही जणांचा मृत्यू व जखमी होण्याची वेळ आलेली आहे. यावरून उपाययोजना तसेच खबरदारी म्हणून सध्या सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळाला पर्यटकांच्या भेटीगाठीसाठी बंदी आणण्यात आलेली आहे. याचा फटका दुर्गम व ग्रामीण भागातील पर्यटन केंद्र तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्यांच्यावर आर्थिक कुराड कोसळली आहे.
दरवर्षी पावसाळ्याचे आगमन होताच धाबा, हॉटेल तसेच काही घरगुती व्यवसायिक मटण- चिकन- मासे- अंडी, कांदा- बटाटा- लसूण- चटणी- मैदा, तांदूळ- गहू- ज्वारी- बाजरी- तेल- दूध- पाव — पनीर –मसाल्याचे विविध पदार्थ, पॅक बंद खाद्यपदार्थ पाण्याच्या बाटल्या असे विविध खाद्यपदार्थांचा साठा करून ठेवतात.
कास, बामणोली, भांबवली, ठोसेघर, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी, यवतेश्वर, पिलाणी, तेटली, गोगवे, मुनावळे, पाटण ,वाई, केळघर, कोयना नगर ,मल्हार पेठ, हेळवाक, सायघर, भिलार या परिसरातील सुमारे चारशे छोटी मोठी हॉटेल, धाबे व घरगुती खानावळ यांनी संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पर्यटकांवर बंदी असल्यामुळे सध्या पालेभाज्या- मटण- चिकन- मासे- दूध- बटर- दही- पनीर असे नाशवंत पदार्थ इतरांना वाटून द्यावी लागत आहे. तर काहींचे नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात पर्यटक दरवर्षी येत असल्यामुळे अनेक जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पण सातारा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाययोजना म्हणून पर्यटन स्थळी बंदी घातल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सध्या सडा वाघापूर, कास, बामणोली, एकीव, मुनावळे, तापोळा, महाबळेश्वर, लिंगमळा, सायघर, तेटली, तापोळा, ठोसेघर, भांबवली अशा विविध ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे किमान सातारा जिल्ह्यात ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले . याला नैसर्गिक परिस्थिती तसेच जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या अचानक निर्णय सुद्धा जबाबदार आहे. असा आरोप आता काही हॉटेल व ढाबा तसेच घरगुती खानावळ करणाऱ्या व्यवसायिकांनी केलेला आहे. दरम्यान, पर्यटन वाढीसाठी शासनाने अनेक चांगली ध्येय धोरण राबवलेले आहे त्याबद्दल स्वागत आहे पण आता ज्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांच्या स्थानिक पातळीवर पंचनामा करून त्यांना शक्य झाले तर वीज देत व पाणी देयक आणि इतर कराबाबत सवलत द्यावी .अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे व हेरिटेज हॉटेलचे संपतराव जाधव, हॉटेल जलसागरचे अरुण कापसे, जगताप हॉटेलचे केशव जगताप यांनी केली आहे…………………………………………………
फोटो – सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटकांची वाट पहावी लागत आहे (छाया- निनाद जगताप, सातारा)
साताऱ्यात पर्यटकांच्या बंदीने ग्रामीण अर्थकारण कोलमडले…
RELATED ARTICLES