साताराः (अतुल देशपांडे यांजकडून) गेली पाच वर्षे वाहतूकीची शिस्त लावण्यासाठी सातारा पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेनी सातारकरांना चांगलाच धडा शिकवला. यातच मागील वर्षापासून शाहूपुरी शाखेच्या कामकाजाचा प्रारंभ झाल्यावर वाहतूक शाखेने मोठया उत्साहाने शहर व शाहुपूरी शाखा यांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपले नियमही कडक केले. घालून दिलेल्या वेळेत एकेरी वाहतूक सुरळीत झाली मात्र वाढती वाहने आणि अरूंद रस्ते यामुळे चारचाकी वाहने रस्त्यावर आणणे एकीकडे कठीण झाले असताना दुचाकी वाहने नक्की लावायची कोठे? हा प्रश्न सामान्य सातारकरांना पडू लागला. रस्त्याच्या बाजूला आखून दिलेल्या पट्टीबाहेर अगदी एक इंचभरही गाडी पार्किंग केलेली आढळली की लगेचच वाहतूक शाखा आपला कायद्याचा बडगा उगारत लावलेली गाडी कधी टो करून घेवून गेली हे कळतसुध्दा नाही. असाच प्रकार चारचाकी साठीही क्षणभर लावलेल्या गाडीला अगदी क्षणात जॅमर कधी लावला गेला हे कळणारसुध्दा नाही. यातूनच सामान्य नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्यात दररोज चौकाचौकात मैफीली घडू लागल्या.
नुकताच असाच काहीसा दमदाटी आणि अरेरावीचा प्रकार सातारा शहरात घडल्यावर सामान्य वाहन चालकांनी मात्र वाहतूक शाखेला टार्गेट करण्यास सुरूवातकेली. शहरातून शिस्तीचे धडे घालून देणार्या क्रेन ज्यावेळी अगदी गल्लीबोळातून फिरत नियम न पाळणार्यांना कायद्याचा बडगा दाखवतात आणि भर दंड-सोड गाडी असाच प्रकार सध्या पहायला मिळतो. या सर्वाला अगदी डोळेझाकपणे विसरला गेलेला प्रकार सध्या सातारा शहरातील शाहु चौक (पालिका इमारत) ते थेट बोगदा परिसरामध्ये वरच्या रस्त्यावर पहायला मिळतो. सतत वर्दळीचा असणारा हा रस्ता विशेषकरून सज्जनगड, ठोसेघर, कास, बामणोली या पर्यटन स्थळासाठी जाणार्या पर्यटकांसाठी अगदी आवडीचा रस्ता आहे. त्यातच दरवर्षी येथून मोठया दिमाखात संपन्न होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची हिल मॅरेथॉन याच रस्त्यावर संपन्न होते. ही स्पर्धा दोन दिवसावर आली की वाहतूक शाखा या मार्गावरील लावलेल्या पार्किंगच्या गाडया हटवायला लागते. मात्र वर्षातील स्पर्धेचे हे दोन दिवस सोडता उर्वरित 363 दिवसांसाठी हा मार्ग आता पार्किंग मार्ग म्हणूनच ओळखू लागला आहे. कोणीही यावे आणि कशीही आणि केव्हाही गाडी लावून जावे असाच प्रकार येथे पहायला मिळतो. अगदी अरूंद रस्त्यात दोन्ही बाजूला लागली ही दोन्ही वाहने पाहता रस्तयावरून ये-जा करणार्या गाडयांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. आजही या गाडयात पोलीस म्हणून बिरूदावली असणार्या गाडयाही आपण पाहू शकाल. मग या गाडयांना वाहतूक शाखा नियम का लावत नाही हाच प्रश्न पुढे येतो. रस्त्यावरील शाहू मंडळ, त्यापुढील अरूंद ओढा, गोविंदनगरी समोरील बस थांबा येथे अशा गाडया गेली अनेक महिने धूळ खात पडून तसूभर हलल्या देखील नाहीत. मग या गाडयांना कोणता आणि किती दंड आकारला जाणार याचे गणित वाहतूक शाखा कधी करणार? हाच प्रश्न पुढे येतो.
कॅप्शन-सातारा शहरातील माची पेठेत रस्त्यामध्येच करण्यात आलेल्या पार्किंगच्या या गाडया वाहतूकीला मोठा अडथळा ठरत आहेत. गेले कित्येक महिने जागेवरून न हललेल्या या गाडयांना वाली कोण? तसेच वाहतूक शाखा अशा वाहनांवर कोणतीच कारवाई का करत नाही हा प्रश्न सामान्य सातारकरांना भेडसावत आहे. (सर्व छायाः अतुल देशपांडे)