सातारा: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले. महाराष्ट्राचा समतोल विकास साधताना त्यांनी वंचितांच्या, शेतकर्यांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. यशवंतरावांच्या विचाराचा वारसा जपताना सामान्य माणसांच्या, शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे हे सरकार असून कालच राज्यातील 15 लाख 42 हजार शेतकर्यांच्या खात्यात 6 हजार कोटी रुपये एवढी कर्जमाफीची रक्कम शासनाने जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त कराड येथील प्रितीसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेच्या व्यासपीठावरुन ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला आकार देण्याचे काम केले. विकसित महाराष्ट्र, समतोल विकास, शेतकर्यांचा, वंचितांचा विकास साधण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले नसले तरी ते पूर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.त्याच दिशेने सरकारचे काम सुरू आहे. कालच राज्यातील 15 लाख 42 हजार शेतकर्यांच्या खात्यात सहा हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केलेली आहे. शासन वंचिताच्या, शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आज स्वर्गीय यशवंतरावाच्या समाधीस्थळावरुन याच कार्याची प्रेरणा घेवून निघालो असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅप्शन-स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतीसंगामवरील समाधीस्थळी आदरांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व इतर मान्यवर
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली ; यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री
RELATED ARTICLES