ड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी

जालंधर : ड्रग्जची समस्या लपवून सरकारला काही फायदा होणार नाही. राज्यात आमची सत्ता आल्यास ड्रग्जची समस्या संपवून टाकू, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.
पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, सरकारला फायदा होत असल्याने ड्रग्जवर बंदी घातली जात नाही. परंतु, राज्यात आमचे सरकार आल्यास एका महिन्यात ड्रग्जची समस्या सोडवू. पंजाबला उज्वल भविष्य हवे असेल तर राज्यातील ड्रग्जचा वापर थांबवणे हा एकमेव पर्याय आहे.
पंजाबमध्ये एकीकडे ड्रग्जची समस्या तर दुसरीकडे कायदा-सुव्यवस्था व बेरोजगारीची समस्या आहे. ड्रग्जची समस्या सोडवायची असेल तर पोलिसांना मोकळीक द्यावी लागेल, हे काम अकाली दल करत नाही. पंजाबमधील ड्रग्जची समस्या चित्रपटातून दाखवली जात आहे. ड्रग्जच्या समस्येवर उडता पंजाब सारखे चित्रपट तयार होत आहेत. मात्र, सरकार सत्य स्वीकारायला तयार होत नाही, असेही गांधी म्हणाले.