अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..!

 

लेखन:- सौ. यशस्वीनीदेवी सत्यजितसिंह
पाटणकर

पाटण तालुक्यातील निसरे गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये ज्योती सुर्वे यांचा जन्म झाला. आई-वडील, तीन मुली व एक मुलगा असे हे कुटुंब होत. ज्योती सर्व भावंडांमध्ये मोठ्या होत्या. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही आपल्या मुली शिकल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत असे वडिलांना नेहमी वाटायचे. म्हणुनच त्यांनी पोटाला चिमटा काढत आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवले. दुर्दैवाने ज्योती १० वी ला नापास झाल्या. तरीही वडिलांनी हार मानली नाही त्यांनी ज्योतींना २ वेळा पुन्हा परिक्षेस बसवले पण तरीही ज्योती काही केल्या पास झाल्या नाहीत. यानंतर सहाजिकच पाटणसारख्या ग्रामीण भागात मुलीच्या लग्नाचा विषय चालू होतो. ज्योती यांच्या बाबतीतही तेच घडले. आई-वडिलांनी पै-पाहुण्यातीलच एक मुलगा पाहून त्याच्याशी ज्योतींचे लग्न लावून दिले.
सुखी संसाराची स्वप्ने घेऊन ज्योती सासरी आल्या. पण नियतीने त्यांच्या आयुष्यात फक्त काळोखच मांडून ठेवला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा छळ सुरु झाला. मारहाण, माहेरुन पैसे आणण्यासाठी त्रास, मानसिक, शारीरिक, लैंगिक छळाने परिसिमा गाठली. पण ज्योती निमुटपणे सगळ सहन करत होत्या. माहेरच्या लोकांना काही कळूनही दिली नाही, का तर माझे माहेर गरीब आहे, माझी भांवडे लहान आहेत, घरात कधी-कधी चूल पेटत नाही. अशा परिस्थितीत जर मी माझ्या समस्या त्यांना सांगितल्या तर त्यांच्या जीवाला काय वाटेल ? वडील हल्ली सतत अजारी असतात, माझ्या काळजीने त्यांचे आजारपण वाढेल परिणामी ज्योती फक्त सहन करत राहील्या. खरचं आजही आपल्या समाजाची ही काळी बाजु आहे. शेवटी हे सगळ सहन करण्याच्या पलीकडे गेले. ज्योतींनी नाइलाजाने वडिलांना सर्वकाही सांगितले, आपल्या मुलीची अवस्था पाहून तडक तिला माहेरी घेऊन आले.
माहेरात येऊन काही दिवसच झाले होते. वडिलांचा आजार बळावला होता, डॉक्टरांनी त्यांच्या छातीचे ऑपरेशन करण्यास सांगितले होते. पण घरात एक दमडी सुध्दा नव्हती. वडील एकटेच कमवते, भांवडाचे शिक्षण, घरचा खर्च, त्यांचा दवाखान्याचा खर्च त्यांच्या जिवावरच चालत होता. आता वडीलच अंथरुणावर होते. या दिवसांत अनेक वेळा घरातील चुल पेटली नव्हती. वडीलांचे आजारपण वाढत होते त्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. भावंडांचे भुकेने व्याकूळ झालेले चेहरे, चिंताग्रस्त आईची कुटुंब चालवण्यासाठीची धडपड…आणि नवऱ्याने सोडलेल्या मुलीला समाजाकडून मारले जाणारे टोमणे! हे सर्व पाहून ज्योतींना असे वाटत होते माहेरी येऊन आपण चूकी तर केली नाही ना?
एके दिवशी ज्योती दुपारी घरामध्ये बसल्या होत्या. उघड्या डोळ्यासमोरही आज फक्त अंधारच होता. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. मनाची कवाडे उघडली गेली, काही झाले तरी आता आपण हार मानायची नाही. आपल्या कुटुंबाला आपणच आधार द्यायचा, स्वतः नोकरी करायचे त्यांनी ठरवले शिवाय आपले शिक्षणही पुर्ण करायचे ठरवले.

येथे मला ज्योतींसाठी चार ओळी सुचतात:-

*उठ ज्योती तु लढायला तयार हो, असशील तु ज्योती पण या काळोखा चिरण्या तु मशाल हो।।*

*असशील आज अबला तु, खचला असेल धीर जरी तुझा…आता तुच तुझ्या कुटुंबाची ढाल हो।।*

*खुप झाला अन्याय, खुप सहन केलास तु अन्याय…उठ पेटूनी आता या अन्यायाला संपवण्या… तुच काली हो तुच दुर्गा हो।।*

ज्योतींमध्ये आता अशी काही जिद्द निर्माण झाली होती की, जी मुलगी १० वीची परिक्षा तीन वेळा देऊनही पास झाली नाही. तीच मुलगी आता पहिल्याच प्रयत्नांमध्ये १० वी, १२ वी च्या परिक्षा उत्तम गुणांनी पास झाली. तेही हॉस्टेलमध्ये राहुन, नोकरी करत. याकाळात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी आणि बहीणीने खुप मदत केली. ज्योती पाटणमध्ये होस्टेलमध्ये राहत होत्या तेव्हा त्यांची धाकटी बहिण सकाळी कॉलेजमध्ये येताना त्यांच्यासाठी डबा घेऊन यायची तोच डबा त्या रात्रीही पुरवूण खात. ह्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणवतात. लढाई दोन वेळच्या जेवणाची नव्हती तर अस्तित्वाची होती
आपल्यावर जो अन्याय, अत्याचार झाला तो कोणावरही कधीही होऊ नये म्हणुन त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे काम सुरु केले. त्यांचे काम आणि समाजासाठी काही तरी चांगले करण्याची धडपड पाहून पुणे ख्रिश्चन धर्मप्रांत ची सामाजिक संस्थेचे सातारा चे प्रमुख फादर अशोक ओहोळ यांनी त्यांना “तु आमच्या सोबत काम करशील का ?” असे विचारले. ज्योतींनी होकार दिला, त्यांना घेऊन ओव्हळ संस्थेच्या ऑफिसमध्ये आले त्यांनी तेथील मुख्य डायरेक्टरांना सांगितले *”डेव्हिड तुला या जॉबसाठी मुलगा हवा होता पण ह्या मुलगी पेक्षा चांगला मुलगा नाही भेटणार”* ज्योतींच्या ह्रदयात हे वाक्य आजही सोनेरी अक्षरांमध्ये कोरले आहे. त्यानंतर ज्योतींनी अनेक सामाजिक संस्थामध्ये काम केले. त्यामध्ये *यशदा* सारख्या सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संस्थाचाही समावेश आहे. त्यांनी पाणी फौंडेशनसाठीही काम केले आहे. सध्या त्या महाराष्ट्र सरकारच्या ‘व्हिलेज डेव्हलपमेंट’ प्रोजेक्टसाठी काम करत आहेत. त्याचबरोबरीने त्या एचआयव्ही, ट्रान्सजेंडर यांसारख्या घटकांवरही काम करत आहेत. देहविक्रय करणाऱ्या महिलासाठीही त्यांनी खुप काम केले आहे. तसेच गोवा विकास प्रशासकीय प्रबोधिनी पणजी (गोवा) आपल्या कार्याचा ठसा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात उठवला आहे.
एवढे सगळे काम केल्यानंतरही ज्योती कोणताही पुरस्कार स्विकारत नाहीत. त्यांच्यामते ‘लोकांचे प्रेम’ हाच माझ्यासाठी खुप मोठा पुरस्कार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लोक त्यांना आज प्रेमाने ‘आक्का’ म्हणतात. हे सर्व करत असताना आक्कांच्या कुटुंबाने नेहमीच त्यांची साथ दिली. आता वडीलांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे. त्यांची तब्येत आता चांगली आहे. एक बहिण ऑस्ट्रेलिया सरकारसोबत काम करत आहे. दुसरी बहिण केमिकल प्लान्टमध्ये उच्च पदावर काम करते या सर्वांनाच आक्कांच्या कामाचा अभिमान वाटतो.
संपूर्ण भारतभर काम केलेल्या ज्योतींना आपल्या पाटण तालुक्यासाठी काम करण्याची खुप इच्छा आहे. ज्या पाटण तालुक्याने आपल्याला ओळख दिली, जी आपली कर्मभूमी आहे तिथे त्यांना खुप काही करायचे आहे. त्यांना असे वाटते की महिलांनी स्वतः च कणखर बनले पाहिजे. फक्त ‘बेटी बचाव…’ चे पोस्टर लावून काही साध्य होणार नाही असे त्या म्हणतात. त्यांनी माझ्याशी बोलताना जर कोणत्याही महिलेला, मुलीला काही समस्या असेल तर त्यांच्याशी त्वरित संवाद साधता यावा म्हणून फोन नंबर दिला. 9822448929 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे.
खरचं वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेक ज्योतींना पोटातच विझवणाऱ्या समाजाला हे कधी पटणार की हीच ज्योती सुर्यापेक्षाही तेजस्वी आणि प्रखर प्रकाश देणारी आहे. मला असे वाटते, स्त्रीविषयी समाजाची असलेली मानसिकता कोणी बदलु शकेल तर तिला जन्म देणारे आई-वडीलच! जर आई-वडिलांनीच मुलगा-मुलगी असा भेदभाव केला नाही, जर आई-वडीलांनाच मुलगी हवी असेल, ते स्वतः आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले तर का जिजामाता, इंदिरा, सरोजनी, ज्योती घडणार नाहीत ? ज्योतींना कधीकधी एखाद्या फौंडेशनचा कार्यक्रम आटपून गावी येताना रात्रीचे १-२ वाजायचे, आपली मुलगी एकटी येणार आहे म्हणून वडील झोप बाजूला ठेवून रस्त्याला डोळे लावून वाट पाहत बसायचे. मुलगी आली कि दोघे २-३ किलोमीटर अंतर सायकलवरुन गप्पा मारत घरी यायची. रात्री-अपरात्री घरी येणाऱ्या मुलीविषयी समाज खुप खोचक बोलत असतो पण वडीलांचा विश्वास होता माझी मुलगी काही वाईट करत नाही तर ती चांगल करत आहे.आज मागे वळून पाहताना तीळमात्र खेद वाटत नाही हाच विश्वास आज प्रत्येक मुलीच्या वडिलांकडे हवा पण त्याचबरोबर प्रत्येक मुलगी सुध्दा ज्योतींसारखीच हवी.

सलाम ज्योती सुर्वेंना…सलाम नारी शक्तीला….!

( पाटण प्रतिनिधी- शंकर मोहिते.)