सर, आपण खूप आधार दिलात…

 सातारा :  सर,आपण आम्हाला  खूप आधार दिलात …आपणाला भेटण्याची इच्छा होती  आपले… आज आपणाला  भेटण्यासाठी आले … आपले खूप खूप आभार … अशा शब्दांमध्ये वंदना गंगाधर बागुल हिने तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
 गंगाधर श्रावण बागुल हे जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर काम करत. विशेषत: तत्कालीन  जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे होते. अचानक एके दिवशी त्यांना अर्धांगवायुचा  झटका आला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तत्कालीन  जिल्हाधिकारी  श्री. मुद्गल यांनी याची दखल घेत त्यांच्यावरील उपचारासाठी मदत केली. जिल्ह्यामध्ये झालेल्या निवडणुकांचे मानधन,  झालेल्या परीक्षांचे मानधन त्याने त्यासाठी दिले. एका न्यायालयीन कामकाजासाठी  श्री. मुद्गल  हे आज सातारामध्ये आले होते. येथील शासकीय विश्रामगृहात श्री. बागुल यांची कन्या वंदना हिने त्यांची आज भेट घेतली. यावेळी श्री. मुद्गल यांनी बागुल यांच्या तब्येतीची विचारपूस  केली. त्यांच्यावर सुरू असणार्‍या उपचारांची  माहितीही  त्यांनी घेतली.
यावेळी वंदना हिने, आपणाला खूप भेटण्याची इच्छा होती. परंतु, माझ्याकडून राहून गेले. आज आपण आल्याचे समजले, आणि खास भेटण्यासाठी  आले. आपण खूप आधार दिलात.आपले आभार अशा शब्दांत  तिने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत  वाघमारे, जिल्हा  प्रशासन अधिकारी  किरणराज यादव, विधी अधिकारी स्नेहल पंडीत, पत्रकार सुजित आंबेकर उपस्थित होते.