मोटारसायकल महामोर्चास मोठा प्रतिसाद; मागील 500 रूपये व या गळीतास; 3500 रूपये दराची मागणी
कराड : सन 2015-16 मधील गळीत झालेल्या ऊसास दिवाळी हप्ता प्रतिटन 500 रूपये मिळावा व या हंगामात 3500 रूपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून गुरूवारी साखर कारखान्यांवर मोटारसायकल महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाला.
पाचवड फाट्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. यानंतर राजाराम बापू साखर कारखाना, य.मो. कृष्णा साखर कारखाना, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, बाळासाहेब देसाई साखर कारखाना या कारखान्यावर हा मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन कारखाना प्रशासनास देण्यात आले.
संघटनेचे संस्थापक बी.जी.पाटील, अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा युवा अध्यक्ष विश्वास जाधव, तालुका अध्यक्ष साजीद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष अशोक सलगर, उत्तम साळुंखे, दीपक पाटील, बाबासाहेब मोहिते, जयवंत पाटील, काकासो शिंदे, जे.एस.पाटील, उत्तम आण्णा खबाले, शिवाजीराव जाधव
यांच्यासह कराड, पाटण, वाळवा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावर्षी एकाही साखर कारखानदाराने दीपावलीचे बील दिलेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकर्यांची दीवाळी आनंददायी होईल की नाही याची शंका वाटू लागली आहे. यासाठी ऊस उत्पादकाच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय बळीराजा शेतकरी संघटनेने घेतला आहे.
गुरूवारी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले. सन 2015-16 चा पाठीमागील गळीत हंगाम सुरू होताना साखरेचे भाव
प्रतिक्विंटल 2100 ते 2200 रुपये होते. त्याच ऊसाच्या साखरेचा भाव आज रोजी 3500 ते 3600 रुपये झाला आहे. तरीही साखर कारखानदार ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा वाढीव मोबदला देण्यास तयार नाहीत. शेतकर्यांना घामाचे दाम मिळवून देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना सज्ज झाली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले. जे- जे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकर्यांना दीपावलीचे बिल देणार नाहीत त्यांचा साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. ऊसाचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे येणार्या काळात ऊसापासून उत्पादन होणार्या साखर व उपपदार्थांना चांगला भाव मिळणार आहे. गेलेल्या ऊसाचे बील प्रतिटन 500 रुपये प्रमाणे व जाणार्या ऊसाला प्रतिटन एकरकमी 3500 रुपये साखर कारखाने देणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी आपल्या ऊसाला कोयतासुद्धा लाऊ देणार नाही.
जोपर्यंत साखर कारखाने मागणीप्रमाणे निर्णय घेत नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकर्यांचे आंदोलन थांबणार नाही. येणार्या गळीत हंगामात ऊसाचे क्षेत्र 50 टक्क्यांहून अधिक घटल्याने ऊस जाण्याची काळजी नाही. पाऊस चांगला झाल्याने पाण्याचाही प्रश्न मिटला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी ऊस दराची लढाई आरपार लढण्यासाठी तयार झालेला आहे. शेतकर्यांच्या मागणीची दखल घेतली नाही तर कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.