प्रचंड त्याग केलेले स्वयंसेवक आणि अत्यंत कडक शिस्तीची संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोव्यातील एका नेत्याने केलेल्या बंडामुळे संघटनेच्या प्रतिमेवर प्रतिकुल परिणाम झाला असून संघ शिस्तीलाही तडा गेला आहे. देशातीलच काय अवघ्या जगात अशी कडक शिस्तीची संघटना शोधूनही सापडणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना ही बाब नेहमीच अभिमानाची वाटते. संघाचे संस्थापक परमपुज्य केशव बळीराम हेगडेवार यांनी जी राष्ट्रनिष्ठा स्वयंसेवकांच्यामध्ये जागविली त्याला खरोखर तोड नाही. या संस्काराच्या शिदोरीवरच संघाची वाटचाल अत्यंत काटेकोरपणे व शिस्तबध्दरित्या सुरू आहे. मात्र गोव्यात जे घडले ते मनालाच न पटणारे होते. घड्याळ्याच्या काट्यावर काम करणार्या संघ सेवकांनी आपल्या संघटनेची प्रतिमा नेहमीच उंचावली. संघ चालकांचा शब्द म्हणजे अंतिम त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय वा व्यक्त केले मत प्रदर्शन याला छेद देण्याची हिंम्मत आजपर्यंत कोणाचीही झाली नाही. हे खरे सरसंघ चालकांनी यापूर्वी अनेकदा केलेल्या वक्तव्यावरून वादंग माजले खरे, पण मोठ्या कुशलतेने त्यांनी व संघाच्या प्रवक्त्यांनी त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याची हातोटी सुध्दा दाखविली. पण यंदा काय माशी शिंकली कुणास ठाऊक. गोव्यात वेलिंगकर विरूध्द संघ असा सामना सुरू झाला आहे. वेलिंगकरांनी गोव्यात संघाचे कार्यकर्ते म्हणून गेल्या 20 वर्षात दाखविलेली शिस्त वाखणण्याजोगी होती. मात्र संघाच्या चौकटीत असे काही घडले की त्यांनी संघ नेतृत्वावरच तोफ डागली. अत्यंत शांत व सुसेगात अशा गोव्या सारख्या राज्यात संघाचे मजबुत बस्तान बसविण्यात सुभाष वेलिंगकर यांनी उचलेले टोकाचे पाऊल आणि त्यांना थोड्या थोडक्या नव्हते तर 350 कार्यकर्त्यांनी दिलेली साथ ही संघासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. नमस्ते सदा वत्सले, मातृभाषेचा घोष करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सच्चा स्वयंसेवकाने मातृभाषेसाठीच चक्क सार्यांनाच ललकारावे यामुळे संघ परिवाराात मोठा गहजब झाला आहे. अन्य राजकीय पक्ष किंवा पक्ष संघटनामध्ये वैचारिक मतभेद संघर्ष, बंड, आदी गोष्टी नियमांनी घडतच असतात. पण गोव्यातील बंडाळीने संघ परिवारातही पाय मातीचेच हे दाखवून दिले. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना तात्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोकणी व मराठी शाळांबरोबरच इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही अनुदान चालू केले होते. मातृभाषेतून शिक्षण ही संघाची मुळ भुमिका आहे. या भुमिकेच्या आधारे भारतीय भाषा सुरक्षा मंच ही संघटना गोव्यात स्थापन झाली. या मंचाचे नेतृत्व हाती घेऊन वेलिंगकर यांनी मातृभाषेतून शिक्षण आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे सरकारी अनुदान बंद करावे असा नारा दिला आहे. या मागणीवरूनच त्यांचे व तात्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे राजकीय वैर वाढत गेले. सरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना सुध्दा वेलिंगकर यांनी रडारवर घेतले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्याप्रमाणे मराठी माध्यमांच्या शाळांची दुरावस्था झाली, तशी गोव्यातही कोकणी व मराठी शाळांची दुरावस्था होऊ शकते. ही बाब ध्यानात घेऊन वेलिंगकर यांनी हा लढा उभारला आहे. मराठी राज्य भाषा आणि मातृभाषेतून शिक्षण हे मुद्दे घेऊन 2012 गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र सरकार सत्तेवर येवूनही इंग्रजी शाळांचे अनुदान बंद झाले नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा हे गोव्याच्या दौर्यावर असताना या प्रश्नावर संघ कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले आणि तिथेच प्रकरणाने गंभीर वळण घेतले. खरं म्हणजे या मागण्या नव्हेतच ती तर गोवेकर जनतेला भाजपाने दिलेली आश्वासने असून त्यातील एकही आश्वासन पाळले गेले नाही व जनतेची फसवणूक झाली आहे. असा बाँब गोळा प्रा. वेलिंगकर यांनी एका मुलाखतीत टाकला आणि या सर्व परिस्थितीला विद्यमान सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हेच जबाबदार आहेत असा थेट हल्लाबोल केला. पर्रिकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वास सहकारी म्हणून ओळखले जातात. वेलिंगकर यांना आपल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागली आणि संघातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. गोव्यासारख्या शांतता प्रिय राज्यात असा बंडाचा झेंडा फडकविला जाईल आणि बंडाचे नेतृत्व गोवा संघ चालक प्रा. सुभाष वेलिंगकर करतील असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. पण मातृभाषेसाठी उघड उघड थेट भुमिका घेण्याची इतकी मोठी शिक्षा कशासाठी हा वेलिंगकर यांचा रोकडा सवाल आहे. त्यांच्या बंडाला महाराष्ट्रातील शिवसेनेने पाठिंबा दिल्याने राज्यात एक नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोव्यात येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार असून यामध्ये वेलिंगकरांची संघटना व गोव्यातील एके काळचा सत्ताधारी आणि प्रबळ पक्ष असलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व शिवसेना यांची युती होऊन भाजपाला आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे देशात आणि अनेक राज्यामध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाच्या तंबुत मोठी चलबिचल सुरू झाली आहे. वेलिंगकरांचे बंड शमविण्यासाठीकिंवा त्यांच्या आव्हानातील हवा काढून घेण्यासाठी संघाच्याकिंवा भाजपच्या चाणक्यांकडून प्रयत्न होतील. हे निश्चित. वेलिंगकरांचा आघातच जिव्हारी इतका जबरदस्त बसला आहे की नेमके काय पाऊल उचलावे याची बंद दरवाजाआड चर्चा सत्रे घडतील मात्र जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती, हेच खरे आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्यावतीने डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न होतील.मात्र हे प्रयत्न सुध्दा अत्यंत शिस्तबध्द संघाच्या रणनितीचा भाग म्हणजे अनुल्लेखाने मारणे. वेलिंगकरांच्या बाबतीत तीच रणनिती अवलंबून त्यांना वगळून पुढे जाणे सध्यातरी संघाचा हाच अजेंडा आहे. मात्र विधानसभा निवडणूकांमध्ये शिवसेना व वेलिंगकर यांची युती भाजपला गोव्यात महाग पडणार नाही याचाही पुरता बंदोबस्त करावा लागणार आहे. कारण महाराष्ट्रातील आलेले धाकटेपण शिवसेनेच्या उरात कुठेतरी सलत आहे. त्याचा उट्ट्या काढण्यासाठी शिवसेना गोव्याच्या व्यासपीठावर गेली आहे. हे खरे.